आमदार वैभव नाईक यांनी ग्रामपंचायत मध्ये खोटी कागदपत्रे दाखवून जनतेची दिशाभूल करू नये संजय वेंगुर्लेकर

भाजपच्या माध्यमातून कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघात 30 कोटीची विकास कामे

कुडाळ (प्रतिनिधी)
खासदार नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे यांच्या माध्यमातून कुडाळ मालवण मतदारसंघासाठी ३० कोटीहून अधिक निधी मंजूर झाला आहे. असं असताना स्थानिक निष्क्रिय आमदार वैभव नाईक हे मात्र या कामांचं श्रेय स्वतः घेऊन ग्राम पंचायतींना या विकासकामांच्या मंजुरीची पत्र पाठवत आहेत. वैभव नाईक यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. त्यामुळे भाजपने मंजूर केलेली काम अशा पत्रांद्वारे लोकांपर्यंत पोहोचवण्याची पोस्टमनगिरी आमदार वैभव नाईक यांनी बंद करावी, असा टोला भाजपचे कुडाळ अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर यांनी लगावला आहे. कुडाळ भाजप कार्यालयात ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

भाजपचे कुडाळ तालुका अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर यांनी आज सायंकाळी भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन कुडाळ मालवण मतदार संघासाठी भाजपच्या माध्यमातून ३० कोटी ३५ लाख रुपये निधी मंजूर झाल्याची माहिती दिली. त्याचवेळी स्थानिक आमदार वैभव नाईक हे याचे श्रेय घेण्यासाठी ग्रामपंचायतींना पत्र पाठून या कामांचे श्रेय घेत असल्याचे सांगितले.आमदार वैभव नाईक यांच्यावर टीका केली. यावेळी विनायक राणे, रुपेश कानडे, पप्या तवटे,सुनील बांदेकर, श्री. बाळा पावसकर उपस्थित होते.

संजय वेंगुर्लेकर म्हणाले, खासदार नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे यांच्या माध्यमातून कुडाळ मालवण मतदारसंघासाठी जवळपास 30 कोटी पेक्षा जास्त निधी उपलब्ध झाला आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हा निधी उपलब्ध झाल्याबद्दल कुडाळ मालवण मधील जनतेच्यावतीने आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो. हे होत असताना या भागातले निष्क्रिय आणि मावळते आमदार वैभव नाईक यांनी या विकासकामाचे श्रेय घेण्याच्या उद्देशाने गेले काही दिवस ते प्रत्येक ग्रामपंचायतला या विकास कामांच्या मंजुरीची पत्र पाठवत आहेत. हि विकास कामे भाजपच्या माध्यमातून मंजूर झाली. फक्त पोस्टमनगिरी करण्याचे काम आमदार वैभव नाईक करत आहेत. जनतेमध्ये किंवा त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याच्या दृष्टीने अशा पद्धतीचा खोडसाळपणा वैभव नाईक करत आहेत.

हे सगळं जर बघितलं तर वैभव नाईक यांच्या पायाखालची वाळू घसरत चालली आहे. वास्तविक जिल्हा अंतर्गत एवढा प्रचंड निधी आपल्या मतदारसंघाला मिळाला. त्यामधील जवळपास १८ कोटी पेक्षा जास्त निधी हा आपल्या कुडाळ तालुक मिळालेला आहे आणि त्याचे सगळे पुरावे आमच्याकडे आहेत. कोणाच्या शिफारशीने हा निधी उपलब्ध झाला त्याची शिफारशी सहित मंजूर यादी आमच्याकडे आहे. हा निधी उपलब्ध होत असताना वेगवेगळ्या हेडच्या खाली हा निधी उपलब्ध झाला. एकूण ३० कोटी ३५ लाख एवढा निधी कुडाळ मालवणसाठी उपलब्ध झाला आहे.

एवढा प्रचंड उपलब्ध झाल्यानंतर या भागातले निष्क्रिय आमदार असलेले आमचे वैभव नाईक बिथरले आहेत आणि अशी खोटी पत्र ग्रामपंचायतला पाठवण्याचा सपाटा त्यांनी लावलेला आहे. वास्तविक पाहता या विकास निधीशी यांचा काडीमात्र संबंध नाही. पत्र पाठवताना त्यांनी म्हटलं की ही विकासकामे तुमच्या ग्रामपंचायत मध्ये मंजूर झाली आहेत. त्याचे कागदपत्रची तुम्ही पूर्तता करा. एक शहाणपणा फक्त त्यांनी दाखवलेला आहे ही विकास कामे माझ्या शिफारशीने मंजूर झाली असे त्यांनी कुठेही म्हटलेले नाही. म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या टपाल खात्याचे काम करणारा एक माणूस म्हणून ते काम करत आहेत. त्यांच्याकडे अजून दुसरे कुठले काम शिल्लक राहिलेले नाही. त्यांचा पराभव त्यांच्या डोळ्यासमोर निश्चितपणे दिसत आहे. त्यामुळे ते वैफल्यग्रस्त झालेत का,प्रश्न आता पडतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page