शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग आस्थापनेकडील कायम कर्मचाऱ्यांचा बेशिस्त कारभार

कार्यालयात दैनंदिन “लेट लतिफ” उपस्थित राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करा

शिवसेनेच्या प्रसाद गावडेंची अधिष्ठातांकडे तक्रार

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग आस्थापनेवर कार्यरत कायम कर्मचारी कार्यालयीन वेळ व शिस्तीचे पालन करत नसून मनमानी कार्यपद्धतीने वागत असल्याचे वागत असून काही ठराविक कर्मचारी दैनंदिन सकाळी १०.४५ नंतरच कार्यालयात हजेरी लावतात असे दिसून आले आहे. याशिवाय हेच कर्मचारी दुपारी २ वाजता जेवणासाठी मुख्यालय सोडतात, ते ३.३० शिवाय परत मुख्यालयी येत नाहीत.मेडिकल कॉलेज व रुग्णालय, सिंधुदुर्ग कार्यालयाचा प्रशासकीय कारभार म्हणजे आज रोजी “आओ जावो घर तुम्हारा” असाच काहिसा असून त्याची गंभीर दखल अधिष्ठातांनी घेण्याची मागणी शिवसेना कामगार सेना अध्यक्ष प्रसाद गावडे यांनी पत्राद्वारे केली आहे. गावडेंनी दिलेल्या पत्रात मेडिकल कॉलेज सुरु झाल्यापासून पहिले काही दिवस वगळले तर तत्कालीन अधिष्ठातांवर याआधी त्या त्या वेळी अनेक आरोप देखील झाले, मात्र कर्मचाऱ्यांचा असा बेजबादारपणा आजपर्यंत कधी दिसून आलेला नाही. कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यास कार्यालयीन कामकाजाची काय भयंकर परिस्थिती चालली आहे याचे पुरावे मिळतील. खेदाची बाब अशी की हेच ” लेट लतीफ” बनून येणारे कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचाऱ्यांना मात्र कार्यालयीन शिस्त, कामकाजातील जबाबदारपणा, कामाबाबतची आस्था व नागरी सेवा शर्तीचे धडे देत असतात याचे नवल वाटत असल्याचे गावडेंनी पत्रात नमूद केले आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या दि.२४-०२-२०२० च्या शासन निर्णयानुसार कार्यालयीन कामकाजाची वेळ सकाळी ९.४५ ते सायं ६.१५ अशी असून कार्यालयीन कर्मचारी महिन्यात तीन पेक्षा अधिक वेळा कामावर उशिरा हजेरी लावत असल्यास त्याची नैमित्तिक रजा वजा करण्यात यावी अशी तरतूद आहे. तरीही ” लेट लतीफ ” बनून हजेरी लावणाऱ्या कर्मचाऱ्यांची दखल घेवून संबंधितांना आवश्यक सूचना देण्यात यावी व कार्यालयात काम करणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांना ” कामाची पदसुची” तपशील देवून कामकाजात सुसूत्रता आणावी अशा मागणीचे पत्र श्री.गावडेंनी दिले असून अधिष्ठाता त्यावर कोणती कार्यवाही करतात हे पाहणे औत्सुक्याचे बनले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page