देवगड हिंदळे येथे सापडला प्रौढांचा मृतदेह

देवगड प्रतिनिधी
हिंदळे भंडारवाडी येथील बेपत्ता असलेले अरुण साबाजी सावंत (५७) यांचा मृतदेह गुरुवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास तेथील ‘भवानीचे कड’ या भागातील समुद्रकिनारी खडकात कुजलेल्या स्थितीत आढळला. ते २३ मेपासून बेपत्ता होते. या घटनेची नोंद देवगड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ मे रोजी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास अरुण सावंत हे पत्नीला आपण ‘हिंदळे सडेवाडी येथील आप्पा रामचंद्र सडेकर हे मयत झाल्याने त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी जातो’ असे सांगूनं घरातून निघून गेले होते. उशिरापर्यंत शोध घेऊनही न सापडल्याने ते बेपत्ता असल्याची फिर्याद त्यांचा मुलगा नितीन सावंत यांनी पोलीस ठाण्यात दिली होती. दरम्यान, सात दिवसांनी गुरुवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृतदेह गावातील ‘भवानीचे कड’ या भागातील समुद्रकिनारी कुजलेल्या स्थितीत आढळला. पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक महेश देसाई करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page