सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित..

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी)
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार असून, जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदासाठी आज आरक्षण जाहीर झाले. या आरक्षणामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण (खुला) प्रवर्गासाठी निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे अध्यक्षपदासाठी कोणत्याही प्रवर्गातील उमेदवार निवडणूक लढवू शकतो.

गेली साडेतीन वर्षे जिल्हा परिषदेवर प्रशासकीय राजवट सुरू होती. मार्च २०२२ मध्ये जिल्हा परिषदेची मुदत संपल्यानंतर निवडणुका न झाल्याने हा कारभार प्रशासकांकडे सोपवण्यात आला होता. मात्र, आता न्यायालयाने डिसेंबर २०२५ पर्यंत निवडणुका घेण्याचे आदेश दिल्याने निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. आज जाहीर झालेल्या आरक्षणामुळे निवडणुकीच्या दृष्टीने हालचालींना वेग येणार आहे.

या आरक्षणामुळे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्षपदासाठी इच्छुकांमध्ये मोठी चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. सर्वसाधारण प्रवर्गासाठी जागा आरक्षित झाल्याने अनेक नवीन चेहऱ्यांना संधी मिळू शकते. राज्याच्या इतरही जिल्हा परिषदांसाठी आज अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. यामुळे सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page