८ वर्षाच्या पूर्वाक कोचरेकर ची राष्ट्रीय बुद्धिबळात एतिहासिक भरारी..!

५ आंतरराष्ट्रीय रेटेड खेळाडूंना चीतपट करत पूर्वाक ने वेधले लक्ष.

सावंतवाडी प्रतिनिधी
‘बुद्धिबळाचा वंडर किड’ म्हणून ओळखला जाणारा, अवघ्या आठ वर्षांचा पुर्वांक कोचरेकर याने आपल्या दुसऱ्याच राष्ट्रीय स्तरावरील बुद्धिबळ स्पर्धेत दिमाखदार कामगिरी करत संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. पाच आंतरराष्ट्रीय रेटेड खेळाडूंना पराभूत करत एकूण पाच गुणांची कमाई केली आहे. आपल्या वयाच्या मानाने दाखवलेला हा आत्मविश्वास आणि बुद्धिबळातील अचूकता केवळ उल्लेखनीय नाही, तर ऐतिहासिक असून, भविष्यातील एका मोठ्या ‘मास्टर’ची चाहूल देणारी आहे.

राष्ट्रीय स्तरावर इतकी मोठी झेप घेण्यापूर्वी, पुर्वांकने आपल्या कौशल्याचा मजबूत ठसा उमटवला होता. सातत्यपूर्ण कामगिरीच्या बळावर त्याने राष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध केली, यापूर्वी पुर्वांकने लोकमत महा गेम्स अंतर्गत आयोजित स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला होता. केवळ आठ वर्षांचा पुर्वांक, ज्याचा अनुभव अगदी मर्यादित आहे, त्याने अनुभवी आणि आंतरराष्ट्रीय मानांकन असलेल्या खेळाडूंना आव्हान देत, त्यांना
चीतपट केले.

पुर्वांकच्या या दैदिप्यमान यशाबद्दल भाजप युवा नेते व महाराष्ट्राचे युवा नेतृत्व विशाल परब यांनी त्याचे खास अभिनंदन केले आहे.

विशाल परब यांनी पुर्वांकला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना गौरवोद्गार काढले, “इतक्या कमी वयात राष्ट्रीय पातळीवर इतके तगडे यश मिळवणे ही अत्यंत अभूतपूर्व आणि गौरवाची बाब आहे. पुर्वांकचा प्रवास केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशातील प्रत्येक नवोदित खेळाडूंना प्रेरणा देणारा दीपस्तंभ आहे. हा कोकणचा हिरा निश्चितच भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर ग्रँडमास्टर बनून देशाचे नाव उज्ज्वल करेल, अशी मला पूर्ण खात्री आहे.”

रत्नागिरीसह संपूर्ण महाराष्ट्रातून पुर्वांक कोचरेकर याच्या या यशाबद्दल कौतुकाचा वर्षाव होत असून, तो लवकरच एका मोठ्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील बुद्धिबळपटू म्हणून उदयास येईल, अशा शुभेच्छा सर्व स्तरातून दिल्या जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page