महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने माणगाव येथे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती करण्यात आली साजरी

बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण

मराठी पत्रकारदिन आज साजरा; बाळशास्त्री जांभेकर यांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले अभिवादन.

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी)
कुडाळ तालुक्यातील माणगाव येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती आज मंगळवारी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मराठी पत्रकारदिन साजरा करण्यात आला.यावेळी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले.

मराठी पत्रकारितेचे जनक ‘दर्पणकार’ बाळशास्त्री जांभेकर यांचा जयंतीदिन ६ जानेवारी रोजी दरवर्षी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. मराठी पत्रकार दिनानिमित्ताने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.संघटनेचे जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर व माणगाव दुरक्षेत्राचे हवालदार सखाराम भोई यांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी उपाध्यक्ष समिल जळवी,सचिव कृष्णा सावंत, माणगाव दुरक्षेत्राचे आनंद पालव, माणगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव साईनाथ नार्वेकर,पोलीस पाटील अभिषेक काणेकर,वेदांत भिसे यांच्यासह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.यावेळी दर्पण’ वृत्तपत्राच्या माध्यमातून समाजाला दिशा देणाऱ्या बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सचिव कृष्णा सावंत यांनी बोलताना सांगितले की,बाळशास्त्री जांभेकरांनी ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू करून मराठी पत्रकारितेचा पाया रचला. बाळशास्त्री हे मराठी पत्रकारितेतील ध्रुवतारा असून त्यांच्यापर्यंत आपल्याला पोहचता येत नसले तरी त्यांच्याकडे पाहून आपण काम केले पाहिजे. बाळशास्त्री जांभेकर यांनी केलेल्या पत्रकारितेतील महान कार्यामुळेच समाजात आज पत्रकारांना सन्मानपूर्वक वागणूक दिली जाते, याच्या मागे बाळशास्त्री जांभेकर यांचे मोठे योगदान असल्याचे मनोगतातून सांगितले. यावेळी बाळशास्त्री जांभेकर यांच्या पत्रकारितेतील कार्याचा आढावा घेण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page