लाड पागे समितीच्या शिफारशिंनुसार जिल्हापरिषदेकडील सफाई कर्मचाऱ्यांच्या 13 वारसांना वारसा हक्काने दिल्या नियुक्त्या

मात्र प्रस्ताव केलेल्या उर्वरित 12 उमेदवारांना नियुक्त्या न दिल्याने संशयास वाव.?

सफाई कर्मचारी वारसांसाठी विभागीय आयुक्त कार्याल्यासमोर प्रजासत्ताक दिनी उपोषण आंदोलन करण्याच्या तयारीत

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसाहक्क लाभ म्हणून जिल्हापरिषद प्रशासनाकडून नियुक्त्या देण्यात आलेल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांचे हस्ते शनिवारी जिल्ह्यातील 13 वारसांना लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार जिल्हा परिषद सेवेचे नियुक्ती पत्र देण्यात आले. मात्र एकूण प्रस्तावांपैकी उर्वरित 12 उमेदवारांना नियुक्त न देण्यामागे कोणते गौडबंगाल आहे याची चर्चा संपूर्ण जिल्हा परिषदेत रंगली आहे प्राप्त माहितीनुसार उर्वरित सर्व उमेदवार शासनाचे सर्व नियम व मार्गदर्शक सूचनानुसार पात्र ठरत असून देखील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कोणत्या कारणास्तव उर्वरित वारसांना नियुक्ती दिली नाही याबाबत उलट सुलट चर्चा कानावर येत आहेत. उर्वरित सफाई कामगार व त्यांच्या वारसांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे याबाबत विचारणा केली असता समर्पक उत्तरे दिली जात नसून उडवा उडवी ची स्वयंरचित कारणे तोंडी स्वरूपात सांगितले जात असल्याचा आरोप सफाई कर्मचाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे. शासन निर्णयानुसार आपण सर्व नियम पात्र ठरत असून देखील जिल्हा परिषद प्रशासन जाणीवपूर्वक आमच्यावर अन्याय करत असल्याचे भावना उर्वरित सफाई कामगार व त्यांच्या वारसांची झाली असून प्रजासत्ताक दिनी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण आंदोलन करण्याचा निर्णय सफाई कामगारांनी घेतला असून तसा पत्रव्यवहार देखील केल्याचे माहिती प्राप्त होत आहे. जिल्हा परिषद प्रशासनाकडून आपल्या वारसांना न्याय मिळेपर्यंत “मेलो तरी बेहत्तर” मात्र उपोषण सोडणार नसल्याची आक्रमक भूमिका सफाई कामगारांकडून घेण्यात आलेली आहे. विभागीय आयुक्त याबाबत कोणती भूमिका घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page