व्हॉईस ऑफ मीडिया च्या ‘महाराष्ट्र पत्रकार मेडिटेट्स’चे थाटात उद्घाटन.! “

“निरोगी शरीर हीच सर्वात मोठी संपत्ती” श्री श्री रविशंकर
पत्रकारांच्या निरोगी मूलमंत्राची काळजी घ्यावी-श्रीकृष्ण चांडक
रविकांत तुपकर,अनिल म्हस्के यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई प्रतिनिधी
पत्रकारांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याला प्राधान्य देत व्हॉईस ऑफ मीडिया, व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम आणि द आर्ट ऑफ लिविंग यांच्या संयुक्त विद्यमाने “महाराष्ट्र पत्रकार मेडिटेट्स” या १० दिवसीय ऑनलाईन ध्यान उपक्रमाचे थाटात उद्घाटन करण्यात आले. २३ फेब्रुवारी ते ४ मार्च २०२६ या कालावधीत दररोज सकाळी ७ ते ८ या वेळेत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात राज्यभरातील अडीच हजार पत्रकार पदाधिकारी सहभागी झाले आहेत.या सर्वांना गुरुदेव श्री श्री रविशंकर मार्गदर्शन करीत आहेत.

उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना श्री श्री रविशंकर म्हणाले, “निरोगी शरीर हीच सर्वात मोठी संपत्ती आहे. पत्रकारांचे कार्य सतत तणावपूर्ण आणि जबाबदाऱ्यांनी भरलेले असते. ब्रेकिंग न्यूजची धावपळ, सामाजिक-राजकीय दबाव आणि अनिश्चित वेळा या सगळ्यात मन:शांती हरवते. अशा वेळी ध्यान, प्राणायाम आणि श्वसनक्रिया हे संरक्षण कवच ठरतात. दिवसातील एक तास स्वतःसाठी दिलात, तर उर्वरित दिवस अधिक सकारात्मक आणि परिणामकारक ठरतो. निरोगी पत्रकार म्हणजे निरोगी समाज.”

उद्घाटन सत्राचे प्रमुख महासागर मीडिया ग्रुपचे संपादक-संचालक श्रीकृष्ण चांडक यांनी पत्रकारांच्या ‘निरोगी मूलमंत्रा’ची जपणूक करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “पत्रकारिता ही सामाजिक बांधिलकी आहे. समाजातील प्रश्न मांडताना पत्रकार स्वतः किती मानसिक ताण सहन करतो, याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे मानसिक आरोग्य ही आता गरज बनली आहे. पत्रकार सशक्त आणि संतुलित असतील तर समाजालाही योग्य दिशा मिळेल. हा उपक्रम पुढील काळात पत्रकार कल्याणाच्या अनेक योजनांना प्रेरणा देईल.”

ज्येष्ठ शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनीही आपल्या भाषणात पत्रकारांच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित केले. “शेतकऱ्यांचे प्रश्न राज्य आणि देशापर्यंत पोहोचवण्यात पत्रकारांनी मोठी भूमिका बजावली आहे. मात्र या संघर्षमय प्रक्रियेत पत्रकारांवर प्रचंड मानसिक ताण येतो. ध्यान ही केवळ आध्यात्मिक प्रक्रिया नसून मानसिक शिस्त आहे. मन स्थिर असेल तर लेखन प्रभावी होते आणि निर्णय अधिक परिपक्व होतात. ‘महाराष्ट्र पत्रकार मेडिटेट्स’ हा उपक्रम पत्रकारांच्या आरोग्याच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरेल,” असे त्यांनी सांगितले. व्हॉईस ऑफ मीडिया, व्ही ओ एम आंतरराष्ट्रीय फोरम चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष यांनी यावेळी आपली भूमिका मांडली.

या ध्यानसत्रांचे नेतृत्व द आर्ट ऑफ लिव्हिंगचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक सलील पुळेकर करत असून, श्री श्री रविशंकर गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली पत्रकारांना ध्यान, श्वसनक्रिया आणि सकारात्मक ऊर्जेचा अनुभव दिला जात आहे.

‘महाराष्ट्र पत्रकार मेडिटेट्स’ हा उपक्रम केवळ ध्यानापुरता मर्यादित नसून पत्रकारांमध्ये मानसिक संतुलन, भावनिक स्थैर्य आणि आरोग्यपूर्ण जीवनशैलीची जाणीव निर्माण करण्याचा व्यापक प्रयत्न आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांतील पत्रकारांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत या अभिनव उपक्रमाचे स्वागत केले आहे.

पत्रकारांच्या आरोग्याला प्राधान्य देणारा हा उपक्रम राज्यात सकारात्मक परिवर्तनाची नांदी ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. व्हॉईस ऑफ मीडिया, व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम ची संपूर्ण टीम याठी परिश्रम घेत आहे. तर द आर्ट ऑफ लिविंग यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य समन्वयक
राहुल पाटील, बिपीन शिंगाडा, फिरोज खान, लक्ष्मण भंडारी, शायनी शेट्टी, सविता शर्मा , विनिता राय , लक्ष्मी शेखर, जिज्ञासा पंड्या, पद्मनाभ देशपांडे, राजश्री राणे, माणिक भोंग, मनीषा चंद्रा ही टीम परिश्रम घेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page