छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सिंधुदुर्गात भव्य नाट्य-सांस्कृतिक सोहळा

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन,
१८ व १९ फेब्रुवारी रोजी आयोजन
सर्वांसाठी विनामूल्य प्रवेश

सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हास्तरीय भव्य नाट्य व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महाराजांच्या शौर्य, पराक्रम आणि अद्वितीय कार्यकर्तृत्वावर आधारित हा दोन दिवसीय सोहळा १८ व १९ फेब्रुवारी २०२६ रोजी कणकवली व सावंतवाडी येथे रंगणार आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते दि. १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता आचरेकर प्रतिष्ठान सभागृह, कणकवली येथे होणार आहे. उद्घाटन सोहळ्यास खासदार नारायण राणे, विधान परिषद सदस्य निरंजन डावखरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, विधान सभा सदस्य दीपक केसरकर तसेच निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य, मुंबई आणि जिल्हा प्रशासन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
पहिला दिवस : ऐतिहासिक नाट्यप्रयोग -कणकवली
दि. १८ फेब्रुवारी २०२६ रोजी आचरेकर प्रतिष्ठान सभागृह, कणकवली येथे शिवचरित्रावर आधारित विशेष नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहे. या नाट्यप्रयोगातून महाराजांचे पराक्रम, स्वराज्य स्थापनेची धडपड आणि त्यांच्या नेतृत्वगुणांचा प्रभावी आढावा रंगमंचावर साकारला जाणार आहे.
दुसरा दिवस : सांस्कृतिक अभिवादन – सावंतवाडी
दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी बॅरिस्टर नाथ पै सभागृह, सावंतवाडी येथे महाराजांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या जीवनकार्यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहे. पोवाडे, नृत्यनाट्य आणि ऐतिहासिक सादरीकरणांद्वारे शिवचरित्र उजळवले जाणार आहे. दोन्ही कार्यक्रमांचा कालावधी सुमारे दोन ते अडीच तासांचा असून, प्रवेश पूर्णतः विनामूल्य आहे.
जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या ऐतिहासिक, प्रेरणादायी आणि अभिमानास्पद कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

००० ०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page