कुडाळ (प्रतिनिधी)
शहरातील गजबजलेल्या पानबाजार परिसरात मंगळवारी दुपारी भरदिवसा राष्ट्रीयीकृत बँक लुटण्याचा प्रयत्न झाल्याने एकच खळबळ उडाली. बँकेतील महिला कर्मचाऱ्याला चाकूचा धाक दाखवून लाखो रुपयांची रोकड लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयिताला बँक कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे आणि नागरिकांच्या धाडसामुळे पकडण्यात यश आले. त्यानंतर नागरिकांनी संशयिताला पोलिसांच्या स्वाधीन केले.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी एक तरुण पानबाजार परिसरातील राष्ट्रीयीकृत बँकेत दाखल झाला. बँकेत प्रवेश केल्यानंतर त्याने महिला कर्मचाऱ्याला चाकू दाखवून रोकड ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे बँकेतील कर्मचाऱ्यांमध्ये घबराट पसरली. मात्र, कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत आरडाओरडा केल्याने बाहेरील नागरिकांचे लक्ष वेधले गेले.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ बँकेत धाव घेत संशयिताला पकडले. यावेळी संतप्त नागरिकांनी त्याला चोप दिला. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांच्या ताब्यात त्याला देण्यात आले. नागरिकांच्या वेळीच केलेल्या हस्तक्षेपामुळे बँकेतील लाखो रुपयांची रोकड सुरक्षित राहिली आणि संभाव्य मोठी घटना टळली.
दरम्यान, या बँक लुटीच्या प्रयत्नामध्ये आणखी एका संशयिताचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्यामुळे या घटनेमागील संपूर्ण कटाचा उलगडा करण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विकास बडवे, पोलीस कर्मचारी प्रमोद काळसेकर यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणून संशयिताला ताब्यात घेतले. याप्रकरणी कुडाळ पोलीस अधिक तपास करीत आहेत.
भरदिवसा शहरातील गजबजलेल्या भागात बँक लुटण्याचा प्रयत्न झाल्याने कुडाळमधील बँका आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, नागरिकांनी दाखवलेल्या धाडसाचे आणि सतर्कतेचे शहरात कौतुक होत आहे.
