कुडाळ प्रतिनिधी
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत कागदपत्रांची कमतरता अडथळा ठरू नये. या उदात्त हेतूने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कुडाळ शाखेत ‘तुमचे दाखले आमची जबाबदारी’ हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. युवा मित्र कक्ष आणि कुडाळचे नगरसेवक तथा युवासेना जिल्हाप्रमुख मंदार श्रीकृष्ण शिरसाट यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. दहावी, बारावी परीक्षा निकालानंतर उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी जात, अधिवास, उत्पन्न, नॉन क्रिमिलियर अशा विविध दाखल्याची आवश्यकता असते. याबाबतची आवश्यक कागदपत्रांची जमवा जमव करताना पालक व विद्यार्थ्यांना नाकीनऊ येते. काही वेळा एखाद्या कागदाची पूर्तता करताना अडचण निर्माण होते. यासाठी पालक व विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे येथील शिवसेना शाखा कार्यालयात तुमचे दाखले.. आमची जबाबदारी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे युवा मित्र कक्ष आणि कुडाळचे नगरसेवक मंदार शिरसाट यांच्या पुढाकारातून व संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना लागणाऱ्या विविध दाखल्यांचे अर्ज मोफत उपलब्ध करून दिले जातील. दाखल्यांसाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांबाबत तज्ज्ञांकडून पूर्ण सहकार्य व मार्गदर्शन मिळणार आहे.
या शाखा कार्यालयात युवा मित्र कक्ष कार्यरत आहे. या सुविधेचा लाभ
घेण्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थी व पालकांनी कुडाळ येथील शिवसेना शाखेत संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी मोबा. ९४०५८१२१२१ येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांसाठी मोफत अर्ज व मार्गदर्शन;नगरसेवक मंदार शिरसाट यांचा पुढाकार
