भोसले सैनिक स्कूलचे निवासी स्काऊट-गाईड शिबिर शिरवल येथे उत्साहात संपन्न…

निसर्गाच्या शाळेत संस्कार, स्वावलंबन व जीवन शिक्षणाचा अविस्मरणीय अनुभव.

केवळ पुस्तकी ज्ञान म्हणजे शिक्षण नव्हे तर अनुभवातून मिळणारे शिक्षणच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला खरी दिशा देते या विचाराला मूर्त रूप देत यशवंतराव भोसले सैनिक स्कूलचे तीन दिवसीय निवासी स्काऊट-गाईड शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. ४ ते ६ मे या कालावधीत शिरवल, ता.दोडामार्ग येथील निसर्गरम्य परिसरात पार पडलेल्या या शिबिरात विद्यार्थ्यांनी संस्कार, स्वावलंबन व जीवन शिक्षणाचा अविस्मरणीय अनुभव घेतला.

शिबिराची सुरुवात ध्वजवंदनाने झाली. यानंतर विद्यार्थ्यांना स्काऊट-गाईडच्या विविध कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यात आले. तंबू उभारणी, विविध प्रकारच्या गाठी बांधणे, सांकेतिक संदेशवहन, शिस्तबद्ध संचलन यांसारखे उपक्रम घेण्यात आले. रात्रीच्या सत्रातील ‘कॅम्प फायर’ व ‘नक्षत्र दर्शन’ हे उपक्रम खूपच रंजक ठरले. निसर्गाच्या सानिध्यात एकत्रितपणे गाणी, खेळ व सांस्कृतिक सादरीकरण यांमुळे शिबिरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

भारत स्काऊट अँड गाईड, सिंधुदुर्गच्या जिल्हा प्रशिक्षण आयुक्त क्लारा डिसोझा यांनी हातांच्या खाणाखुणा व शिट्टीच्या सहाय्याने संदेशवहनाची प्रात्यक्षिके दाखवली. आपत्कालीन परिस्थितीतील प्रथमोपचार, सीपीआर तंत्र याविषयीसुद्धा मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांना विनाचुल स्वयंपाक ही पद्धत शिकवण्यात आली. शिरवल परिसरातील धरण आणि वनक्षेत्राला भेट देत विविध औषधी वनस्पती, जैवविविधता आणि प्राण्यांच्या पाऊलखुणा याचीही माहिती देण्यात आली. पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण करण्यासाठी स्थानिक मंदिर परिसरात स्वच्छता करण्यात आली.

भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले यांनी शिबिराला भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, “विद्यार्थ्यांनी आपल्या मातीशी आणि संस्कृतीशी जोडले गेले पाहिजे. ग्रामीण जीवनातील साधेपणा, एकजूट आणि सेवाभाव यांतूनच जबाबदार नागरिक घडतात.” संस्थेच्या अध्यक्षा ॲड.अस्मिता सावंतभोसले यांनीही विद्यार्थ्यांच्या सहभागाचे आणि प्रशिक्षकांच्या प्रयत्नांचे विशेष अभिनंदन केले.

हे शिबिर यशस्वी करण्यासाठी शाळेच्या स्काऊट-गाईड प्रशिक्षक श्वेता खानोलकर, प्राची कुडतरकर, एस्तर परेरा, सचिन हरमलकर तसेच सहाय्यक कर्मचारी अस्मिता परब व जानू पाटील यांनी परिश्रम घेतले. जागतिक स्काऊट गाईड चळवळीचे प्रणेते लॉर्ड बॅडन पॉवेल यांच्या विचारांचा अंगीकार करत विद्यार्थ्यांनी शिस्त, सेवाभाव आणि आत्मनिर्भरतेचा नवा संकल्प या शिबिरातून केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page