रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या उपाययोजना
सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी
ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट या संघटनेने राज्य व देशात कार्यरत असलेल्या ऑनलाईन इंटरनेट फार्मसीच्या विरोधात मंगळवार दि. २० मे २०२६ रोजी देशव्यापी बंदची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात रुग्णांची गैरसोय होऊ नये तसेच अत्यावश्यक औषधांचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी अन्न व औषध प्रशासन, सिंधुदुर्ग कार्यालयाने विविध उपाययोजना केल्या आहेत.
याबाबत जिल्ह्यातील किरकोळ व घाऊक औषध विक्रेता संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली असून नियोजित बंदमध्ये सहभागी होऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच औषध विक्रेत्यांशी वैयक्तिक स्तरावर संपर्क साधून नागरिकांच्या हिताचा विचार करून औषध सेवा सुरू ठेवण्याचे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.
संघटनेच्या बंदच्या काळात रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी काही औषध दुकाने सुरू ठेवण्याबाबत संबंधित पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या असून त्यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. याशिवाय जिल्ह्यातील काही दवाखान्यांलगतची औषध दुकाने सुरू राहणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
आणीबाणीच्या प्रसंगी औषधांची आवश्यकता भासल्यास नागरिकांनी अथवा नातेवाईकांनी औषध निरीक्षक व सहाय्यक आयुक्त (औषधे) अन्न व औषध प्रशासन, सिंधुदुर्ग कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक पुढीलप्रमाणे :
१) श्री. एस. पी. यादव, सहाय्यक आयुक्त (औषधे) – ९६५७६७८२९४
२) श्री. एस. पी. वाढे, औषध निरीक्षक – ९९२१८५९२४५
३) अन्न व औषध प्रशासन, सिंधुदुर्ग कार्यालय – ०२३६२-२२८८५१
नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता आवश्यकतेनुसार प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त (औषधे) तथा कार्यालय प्रमुख, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, रत्नागिरी (अतिरिक्त कार्यभार सिंधुदुर्ग) यांनी केले आहे.
