वेंगुर्ला नगरपरिषदेचा १५० वा वर्धापन दिन म्हणजे प्रत्येक वेंगुर्ले वासीयांसाठी अभिमानास्पद दिवस:प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई
वेंगुर्ला प्रतिनिधी
वेंगुर्ला नगरपरिषदेच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांनी नगरपरिषद प्रशासन, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी तसेच वेंगुर्लावासीयांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यानिमित्त नगरपरिषद सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रसन्ना देसाई यांनी उपस्थित राहून नगराध्यक्ष राजन गिरप , उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर , नगरसेवक व प्रशासनातील अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
यावेळी वेंगुर्ला नगरपरिषदेच्या दीडशे वर्षांच्या गौरवशाली वाटचालीचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, “वेंगुर्ला नगरपरिषद ही कोकणातील ऐतिहासिक आणि लोकाभिमुख संस्था असून शहराच्या विकासात तिचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले आहे. स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण आणि नागरिक सुविधांच्या माध्यमातून नगरपरिषदेने सातत्याने उल्लेखनीय कार्य केले आहे.”
तसेच आगामी काळात वेंगुर्ला शहर अधिक आधुनिक, सुंदर आणि नागरिकाभिमुख बनविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. “लोकसहभाग आणि प्रशासन यांचा समन्वय साधल्यास वेंगुर्ला शहर विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचेल,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी प्रसन्ना देसाई यांचे स्वागत केले. नगरपरिषदेच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त शहरात विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
