३५ वर्षांची ज्ञानसेवा पूर्ण; प्रा. प्रमोद धुरी यांचा सेवानिवृत्तीपर भव्य सत्कार

“माणगाव हायस्कूलमधील एक स्मितहास्य व्यक्तिमत्त्व निवृत्त होत आहे”:राजू रांगणेकर

कुडाळ:ज्ञानदानाचा अखंड यज्ञ, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अविरत धडपड आणि शिस्त, संस्कार व गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा सातत्याने घेतलेला ध्यास… अशा आदर्श शिक्षकाची ओळख निर्माण करणारे श्री. वासुदेवानंद सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, माणगाव येथील व्यावसायिक विभागाचे प्राध्यापक प्रमोद रवींद्र धुरी हे नियत वयोमानानुसार मंगळवार, दि. ३० जून रोजी सेवेतून निवृत्त होत आहेत. त्यांच्या ३५ वर्षांहून अधिक प्रदीर्घ, निष्ठावान आणि विद्यार्थीकेंद्री शैक्षणिक सेवेचा गौरव करण्यासाठी सोमवारी पूर्वसंध्येला माणगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने त्यांचा अत्यंत भावपूर्ण व स्नेहपूर्ण सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात संस्थेचे ज्येष्ठ संचालक मेघ:शाम उर्फ शामा पावसकर, विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश उर्फ राजू रांगणेकर, मुख्याध्यापक चंद्रकांत चव्हाण आणि पर्यवेक्षक प्रशांत आडेलकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन प्रा. धुरी यांचा गौरव करण्यात आला. या भावनिक क्षणांचे साक्षीदार म्हणून त्यांच्या सौभाग्यवती प्राध्यापिका सौ. माधुरी प्रमोद धुरी याही उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना ज्येष्ठ संचालक मेघ:शाम उर्फ शामा पावसकर म्हणाले, “प्रमोद धुरी हे केवळ शिक्षक नाहीत, तर एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहेत. अध्यापनाबरोबरच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी, सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांमध्ये त्यांनी दिलेले योगदान अत्यंत मोलाचे आहे. त्यांच्या कार्याचा ठसा संस्थेच्या इतिहासात कायमस्वरूपी उमटलेला राहील.”
मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश उर्फ राजू रांगणेकर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, “माणगाव हायस्कूलमधील एक सदैव स्मितहास्य असलेले व्यक्तिमत्त्व आज सेवेतून निवृत्त होत आहे. त्यांचा शांत, संयमी आणि सकारात्मक स्वभाव सर्वांना प्रेरणा देणारा होता. विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी यांच्याशी त्यांनी जपलेले आपुलकीचे नाते कायम स्मरणात राहील.”
प्रा. प्रमोद धुरी यांनी आपल्या सेवाकाळात हजारो विद्यार्थ्यांना केवळ व्यावसायिक शिक्षणच दिले नाही, तर त्यांच्यामध्ये शिस्त, प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि सामाजिक बांधिलकी यांसारख्या मूल्यांचेही संस्कार रुजविले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांत यश मिळवून विद्यालयाचे नाव उज्ज्वल केले.
सत्कार सोहळ्यावेळी उपस्थित मान्यवर, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी प्रा. धुरी यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या पुढील आयुष्यासाठी निरोगी, आनंदी आणि समाधानमय जीवनाच्या शुभेच्छा दिल्या. निरोपाच्या या प्रसंगी उपस्थितांच्या मनात कृतज्ञतेची भावना आणि डोळ्यांत दाटलेला भावनिक ओलावा स्पष्टपणे जाणवत होता. त्यांच्या ३५ वर्षांच्या समर्पित सेवेला उपस्थितांनी उभे राहून मानाचा मुजरा केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page