वझरे गावाला जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांनी भेट देत साधला ग्रामस्थांशी संवाद‌

दोडामार्ग प्रतिनिधी
शनिवारी रात्री दोडामार्ग तालुक्यात झालेल्या मुसळधार वादळी पावसामुळे वझरे गावातील २८ घरांचे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आज वझरे गावाला भेट देऊन नुकसानग्रस्त घरांची प्रत्यक्ष पाहणी केली तसेच ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांना धीर दिला.

यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी नुकसानग्रस्त कुटुंबाची परिस्थिती जाणून घेतली. यावेळी संबंधित तलाठ्यांनी नुकसानग्रस्त घरांचे प्राथमिक पंचनामे पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली. उर्वरित कार्यवाही तातडीने पूर्ण करून शासनाच्या नियमानुसार मदत प्रक्रिया वेगाने राबविण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आवश्यक सूचना दिल्या.

ग्रामस्थांनी वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडली. त्यांच्या अडचणी आणि अपेक्षा संयमाने ऐकून घेत जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी प्रशासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा विश्वास व्यक्त केला. आवश्यक ती सर्व प्रशासकीय कार्यवाही तत्परतेने केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

या पाहणी दौऱ्यावेळी उपविभागीय अधिकारी विरसिंग वसावे, तहसीलदार राहुल गुरव, निवासी प्रज्ञा राजमाने, पोलीस पाटील, सरपंच, ग्राम महसूल अधिकारी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page