सावंतवाडी प्रतिनिधी
येथील प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार
मनोज मुसळे (वय ५५, रा. कणकवली) यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. प्रकृती अचानक अस्वस्थ झाल्यानंतर त्यांना तातडीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.
मुसळे यांनी महसूल विभागात प्रदीर्घ सेवा बजावली होती.
आपल्या सेवाकाळात त्यांनी कणकवली, वैभववाडी, मालवण, कुडाळ आणि सावंतवाडी येथील तहसीलदार कार्यालयांमध्ये नायब तहसीलदार म्हणून जबाबदारी सांभाळली होती. सध्या ते सावंतवाडी प्रांत कार्यालयात नायब तहसीलदार म्हणून कार्यरत होते. महसूल प्रशासनातील कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव असलेले मुसळे हे कर्तव्यनिष्ठ आणि अनुभवी अधिकारी म्हणून परिचित होते.
त्यांच्या आकस्मिक निधनाने महसूल विभागासह सावंतवाडी आणि कणकवली परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
