पोक्सो प्रकरणातील आरोपी रमेश चव्हाण (रा.पडेल) न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता

संशयित आरोपीच्या वतीने ॲड.अशपाक शेख यांचा युक्तिवाद ..

सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी
पडेल कॅन्टीन (ता. देवगड) येथील मतिमंद व दत्तक घेतलेल्या अल्पवयीन मुलीवर कथित लैंगिक अत्याचार केल्याच्या गंभीर प्रकरणात संशयित आरोपीची मा. न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणी विजयदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. ३१/२०२३ अन्वये भा.दं. वि. ३७६ सह पोक्सो (POCSO) कायद्यातील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दिनांक २० मे २०२३ रोजी रात्री आरोपी रमेश महिपत चव्हाण (वय ४९, रा. पडेल कॅन्टीन) याने घरातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप ठेवत त्याच्या नातेवाईकाने १६ जून २०२३ रोजी विजयदुर्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीला अटक करून मे. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

मे. न्यायालयातील सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाकडून मुलगी अल्पवयीन व दत्तक असल्याचे सांगण्यात आले. मात्र, आरोपीचे मुख्य वकील ॲड. अशपाक शेख यांनी सरकारी पक्ष पीडित मुलगी अल्पवयीन आणि दत्तक असल्याचे न्यायालयात सिद्ध करू शकला नाही, ही अत्यंत महत्त्वाची बाब मा. न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. तसेच फिर्याद दाखल करण्यास झालेला तब्बल 26 दिवसांचा विलंब, तपासातील गंभीर त्रुटी व साक्षी-पुराव्यांमधील विसंगती त्यांनी ठळकपणे मांडली.

बचाव पक्षाचा हा युक्तिवाद आणि तपासातील त्रुटी ग्राह्य धरून, मा. न्यायाधीश श्री. एस. टी. त्रिपाठी साहेब यांनी दिनांक ०३/१०/२०२६ रोजी आरोपीची सर्व आरोपातून ससन्मान निर्दोष मुक्तता करण्याचा निकाल दिला.

सदर प्रकरणात आरोपीच्या वतीने मुख्य वकील ॲड. अशपाक शेख यांनी काम पाहिले असून ॲड. नामदेव मठकर, ॲड. विनय रजपूत, ॲड. कैस शेख ॲड. भुषण कदम व ॲड. हरेश वरावडेकर यांनी त्यांना सहाय्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page