प्रवाशांना त्रास होऊ नये याकरीता पाण्याच्या बॉटल्सचे केले वाटप
दरवाढ तात्काळ रद्द करावी,अन्यथा यापेक्षाही मोठे आंदोलन करू:संदेश पारकर
कणकवली प्रतिनिधी
एसटी तिकीट दरवाढी विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर,कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली आज कणकवली बसस्थानकात चक्कजाम आंदोलन छेडण्यात आले. यावेळी अर्धा तास एसटी रोखून धरण्यात आली. एसटीमध्ये बसलेल्या प्रवाशांना याचा त्रास होऊ नये याकरता प्रवाशांना पाण्याच्या बॉटल्स देखील वाटण्यात आल्या. दरवाढीच्या निषेधाचे फलक झळकवत एसटी तिकीट दरवाढ करणाऱ्या सरकारचा निषेध असो! गोरगरीब जनतेची लूट करणाऱ्या सरकारचा निषेध असो! या सरकारचे करायचे काय खाली डोके वर पाय! महायुती सरकारचा निषेध असो! अशा घोषणा देऊन शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला.
यावेळी संदेश पारकर म्हणाले, राज्यभर एसटीच्या भाववाढीविरोधात आंदोलन छेडण्यात येत आहे. एसटी तिकिटात १५ टक्के दरवाढ झाली आहे. या दरवाढीचा जाहीर निषेध आम्ही करत आहोत.एसटीच्या जुन्या गाड्यातून लोकांना प्रवास करावा लागत असून एसटी गाड्या वेळेत सोडल्या जात नाहीत. लोकांना एसटी महामंडळाकडून चांगल्या सुविधा दिल्या जात नाहीत मात्र दरवाढ जनतेच्या माथी मारली जात आहे. महायुती सरकारने याचा फेरनिर्णय घेऊन दरवाढ तात्काळ रद्द करावी. अन्यथा यापुढे यापेक्षाही मोठे आंदोलन करू असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी दिला.
सतीश सावंत म्हणाले, एसटीची भाडेवाढ करून उत्पन्न मिळविणे एवढाच कार्यक्रम आज महायुती सरकार राबवत आहे. एकीकडे ग्रामीण भागातील एसटी सेवा कोलमडली आहे. शालेय फेऱ्यांमध्ये देखील दिरंगाई होत आहे. आणि दुसरीकडे तिकीट दरवाढ करण्यात आली. हे निषेधार्थ आहे. त्यामुळे विभागीय वाहतूक अधीक्षक निलेश लाड यांच्याशी चर्चा करून एसटी सेवा सुधारण्याबाबत विभागनियंत्रकांनी ४ दिवसात बैठक घ्यावी अशी सूचना आम्ही केली आहे. सिंधुदुर्ग साठी नवीन एसटी गाड्या द्याव्यात अशी मागणी देखील श्री. सावंत यांनी केली.
यावेळी विभागीय वाहतूक अधीक्षक निलेश लाड यांच्याशी चर्चा करताना प्रवाशांना
उद्धवणाऱ्या समस्यांचा पाढाच वाचण्यात आला. कणकवली बसस्थानकातील स्वच्छतागृह अस्वच्छ झाले असून त्याची तातडीने स्वच्छता करा. जुन्या गाड्यातून प्रवासी वाहतूक थांबवा. शालेय फेऱ्या वेळेत सोडा. बंद झालेल्या फेऱ्या पुन्हा सुरू करा अशा सूचना करण्यात आल्या. तसेच दरवाढ रद्द करण्याबाबतचे निवेदन देण्यात आले. आंदोलनातील मागण्या वरिष्ठ कार्यालयाला पाठवण्याची ग्वाही यावेळी श्री. लाड यांनी दिली.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, तालुकाप्रमुख कन्हैया पारकर,महेश कोदे, सचिन सावंत,आबू मेस्त्री, प्रसाद अंधारी, राजू राठोड,उत्तम लोके,वैदेही गुडेकर,तात्या निकम, तेजस राणे,आदित्य सापळे,दिव्या साळगावकर, धनश्री मेस्त्री,हेलम कांबळी, गुरुनाथ पेडणेकर, बाळा राऊत,विलास गुडेकर,जितू कांबळी, प्रतीक रासम अनिल जाधव, अजित काणेकर,चंदू परब,बाबू केणी, लक्ष्मण हन्नीकोड, मिलिंद आईर आदींसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
