जिल्हा वीज ग्राहक संघटना शुक्रवारी घेणार नूतन अधीक्षक अभियंता,अभिमन्यू राख यांची भेट

वीज ग्राहकांना एमआयडीसी कुडाळ येथे लिखित तक्रारींसह येण्याचे आवाहन

सावंतवाडी प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाला म्हणावी तशी सुरुवात झाली नसतानाही विविध वीज समस्यांनी जिल्ह्यातील ग्राहक हैराण झाले आहेत. महावितरणच्या वीज सेवांचा जिल्हाभर पुरता बोजवारा उडालेला आहे. अशातच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महावितरणचे अधीक्षक अभियंता साळुंखे यांची बदली होऊन नूतन अधीक्षक अभियंता पदी श्री अभिमन्यू राख यांची नियुक्त होऊन त्यांनी कार्यभार स्वीकारलेला आहे. परंतु मागच्यावेळी प्रत्यक्ष अधीक्षक अभियंता यांची भेट न झाल्याने जिल्ह्यातील वीज समस्या बाबत त्यांच्याशी चर्चा करता आलेली नाही. अधीक्षक अभियंत्यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर पुन्हा एकदा जिल्ह्यातील वीज समस्या त्यांच्या नजरेत आणून देणे क्रमप्राप्त आहे जेणेकरून जिल्ह्यातील महावितरणचे सत्य परिस्थिती त्यांना ज्ञात होईल. यासाठीच सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेचे पदाधिकारी, सदस्य व जिल्ह्यातील वीज ग्राहक शुक्रवार दिनांक २० जून २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता कुडाळ येथील अधीक्षक अभियंता कार्यालयात त्यांची भेट घेणार आहेत. यावेळी दोडामार्ग तालुक्यातील वीज ग्राहक मोठ्या संख्येने येणार आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शून्य वीज चोरी, वीज थकबाकी अशी परिस्थिती असतानाही वीज ग्राहकांना चार चार दिवस अंधारात राहण्याची वेळ येते. सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग, मालवण तालुक्यातील समस्या तर मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. आजही शहरांमध्ये दिवसातून पाच ते दहावेळा तर तालुक्याच्या बहुतांश गावांमध्ये वीज खंडित होण्याचे प्रकार सुरू आहेत. रात्रीच्या वेळी तर विजेचा खेळच सुरू असतो. यासाठीच वीज ग्राहक संघटनेच्या पदाधिकारी, सदस्यांनी तसेच जिल्ह्यातील वीज समस्यांनी प्रभावित असलेल्या वीज ग्राहकांनी, गावागावातील ग्रामपंचायतीच्या सरपंच, सदस्यांनी आपापल्या गावातील वीज समस्या लेखी स्वरूपात, तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायत पैकी कोणत्याही गावात ज्या ज्या ठिकाणी नवीन सब स्टेशन, नवीन फिडर, नवीन रोहित्रे, नवीन पोल, नवीन वायर, नवीन केबल, रेग्युलर जुन्या पद्धतीचे मीटर ( स्मार्ट मीटर नको ) तसेच भूमिगत केबल लाईन आवश्यक असल्यास त्याची सविस्तर यादी आणि तपशील मागणी पत्रासहित न विसरता सोबत घेऊन कुडाळ येथे उपस्थित रहावे असे जाहीर आवाहन वीज ग्राहक संघटना सिंधुदुर्गच्या वतीने करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page