माजी उपनगराध्यक्ष महेश सुकी दाम्पत्यासह,शिवसेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांचा विशाल परब यांच्या उपस्थितीत भाजपात धडक प्रवेश..
सावंतवाडी प्रतिनिधी
सावंतवाडीच्या राजकारणात आज मोठा उलथापालथीचा दिवस ठरला. माजी उपनगराध्यक्ष महेश सुकी आणि माजी नगरसेविका शुभांगी सुकी यांनी भाजप युवा नेते विशाल परब यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश करत शिवसेनेला जबरदस्त धक्का दिला. नगरपरिषद निवडणूक तोंडावर असताना झालेल्या या पक्षांतराने राजकीय समीकरणे ढवळून निघाली असून शिवसेनेची पकड सैल झाल्याचा स्पष्ट संदेश जनतेत गेला आहे. पालकमंत्री नितेश राणे व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास आणि युवा नेते विशाल परब यांचा करिष्मा या प्रवेशात दिसला.
एक-दोन नव्हे तर थेट प्रभाग क्रमांक ३ मधील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेला रामराम ठोकत भाजपचा झेंडा हाती घेतला. सायली शिंदे, प्राजक्ता बांदेकर, इम्रान शेख, जावेद शेख, सुजाता शिंदे, नेहा तावडे, पुजा मिशाळ यांच्यासह अनेकांनी पक्ष बदल केला. हे केवळ प्रवेश न राहता शिवसेनेच्या गोटात पडलेले मोठे भगदाड ठरले आहे.
उपनगराध्यक्षपदाची धुरा सांभाळलेले महेश सुकी हे तब्बल दहा वर्षांपासून सावंतवाडीच्या राजकारणातील मजबूत स्तंभ मानले जात होते. तर शिवसेनेत सक्रिय असलेल्या शुभांगी सुकी यांचा भाजपात प्रवेश म्हणजे शिवसेनेच्या नेतृत्वावरच उपस्थितीत जनतेतून प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. “विकासाची दिशा भाजपकडे, मतदारांचा कल भाजपकडे” असा स्पष्ट राजकीय संकेत या प्रवेशातून मिळत असल्याचे जाणकार सांगत आहेत.
या शक्तिप्रदर्शनप्रसंगी युवराज लखमराजे भोंसले, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले आणि वेदीका परब यांची प्रमुख उपस्थिती होती. महिलावर्गातूनही भाजपाला भक्कम पाठिंबा लाभत असून महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर यांच्यासह संध्या तेरसे, मनोज नाईक, आनंद नेवगी, रविंद्र मडगावकर, केतन आजगावकर, मोहिनी मडगावकर, शर्वरी गावकर, रेश्मा सावंत, मानसी धुरी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.
या पक्षप्रवेशानंतर सावंतवाडीत “भाजपच पर्याय, भाजपा दिशा” अशी चर्चा जोमात सुरू असून येत्या निवडणुकीत याचे कटू परिणाम शिवसेनेला भोगावे लागणार हे आता स्पष्ट होत आहे.
