मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत जलयान पुरवठा व जहाजबांधणीसाठी सामंजस्य करार
सावंतवाडी तळवणे येथे २२ एकर जागेवर उभा राहणार प्रकल्प
मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पासाठी लागणारी अत्याधुनिक जलयाने निर्माण करणार
सागरी क्षेत्रात महाराष्ट्राची मोठी झेप; मंत्री नितेश राणे यांच्या कार्यक्षमतेची महाराष्ट्राला प्रचिती
महाराष्ट्र सागरी मंडळ आणि मे.झोया मरीन सर्व्हिसेस प्रा.लि. यांच्यामध्ये झाले सामंजस्य करार
मुंबई प्रतिनिधी
मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पासाठी जलयाने (Water Metro Vessels) उपलब्ध करून देणे तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात जहाज बांधणी (Shipbuilding) सुविधा विकसित करण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र सागरी मंडळ आणि मे.झोया मरीन सर्व्हिसेस प्रा.लि. यांच्यामध्ये सामंजस्य करार (MoU) आज मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी या दोन्ही महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या अंमलबजावणीसह विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली.
या सामंजस्य करारानुसार मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पासाठी आवश्यक असलेली आधुनिक व पर्यावरणपूरक जलयाने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील तळवणे येथे सुमारे २२ एकर जागेवर सुमारे १५० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीत इलेक्ट्रिक बोट निर्मितीचा अत्याधुनिक कारखाना उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रात हरित सागरी वाहतुकीला चालना मिळण्यासोबतच जहाजबांधणी क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढणार आहे.
आदरणीय मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सागरी क्षेत्रात मोठी गुंतवणूक आकर्षित करण्यावर भर दिला जात आहे. मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पासाठी अत्याधुनिक जलयाने उपलब्ध करून देण्याबरोबरच सिंधुदुर्गमध्ये इलेक्ट्रिक बोट निर्मितीचा उद्योग उभारल्यामुळे राज्याच्या सागरी अर्थव्यवस्थेला नवे बळ मिळेल. यामुळे स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतील, आधुनिक जहाजबांधणीला चालना मिळेल.
बैठकीस परिवहन व बंदरे विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजय सेठी,महाराष्ट्र सागरी मंडळाचे वरिष्ठ अधिकारी, मे.झोया मरीन सर्व्हिसेस प्रा. लि.चे संचालक जॉन फर्नांडिस, संचालक सुरज देवाढीया तसेच डॉ.निलेश बानवलीकर उपस्थित होते.
