आरोंदा जिल्हा परिषद मतदार संघात सुदन कवठणकर यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा;कार्यकर्त्यांचासह जनतेचाही मोठा पाठिंबा

सावंतवाडी प्रतिनिधी
आगामी जिल्हा परिषद निवडणुकीचे वारे वाहू लागले असून आरोंदा मतदारसंघातून शिवसेनेच्या (शिंदे गट) उमेदवारीसाठी सुदन कवठणकर यांचे नाव सध्या अग्रक्रमाने घेतले जात आहे. कवठणी गावातील एक अभ्यासू सामाजिक कार्यकर्ता म्हणून जनमाणसात उमटलेली त्यांची मुद्रा आणि सध्या शिवसेना ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी केलेले संघटन कौशल्य यामुळे त्यांच्याकडे एक सक्षम नेतृत्व म्हणून पाहिले जात आहे. सुदन कवठणकर हे सर्वांना सोबत घेऊन जाणारे व्यक्तिमत्व असून त्यांच्या पाठीशी युवा कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण झाली आहे.

जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणे आणि केवळ आपल्या गावापुरते मर्यादित न राहता परिसरातील गावांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. रात्री-अपरात्री कोणत्याही कामासाठी हाक मारली असता तत्परतेने धावून जाण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे आरोंदा मतदारसंघातील सातार्डा, सातोसे, मडुरा आणि आरोंदा या गावांतून त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी आता मागणी जोर धरू लागली आहे.

कवठणकर यांचा राजकीय आणि सामाजिक कार्याचा अनुभव दांडगा असून, यापूर्वी त्यांच्या पत्नी सौ. सुमन सुदन कवठणकर यांनी कवठणी

गावच्या प्रथम नागरिक म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. त्यांच्या सरपंचपदाच्या कार्यकाळात सुदन कवठणकर यांनी आपल्या व्हिजनमधून गावाच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण कामे मार्गी लावली होती. याच अनुभवाच्या जोरावर आरोंदा मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी त्यांना जिल्हा परिषदेत पाठवण्याचा निर्धार मतदार व्यक्त करत आहेत.

विशेष म्हणजे, सुदन कवठणकर यांच्या कार्याची दखल केवळ मित्रपक्षांनीच नव्हे, तर विरोधी पक्षातील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनीही घेतली आहे. अशा तडफदार आणि विकासवेड्या नेतृत्वाला संधी मिळाल्यास आपणही त्यांना सहकार्य करू, असे आश्वासन विरोधी गटातील काही कार्यकर्त्यांकडून दिले जात आहे. या पार्श्वभूमीवर, पक्षाने अशा तरुण आणि लोकसंपर्क असलेल्या नेतृत्वाला संधी द्यावी, अशी मागणी आता आरोंदा मतदारसंघातून प्रकर्षाने होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page