नेरूर ची एकजूट हीच या पॅनलची ताकद:रुपेश पावसकर
कुडाळ प्रतिनिधी
तालुक्यातील नेरूर जिल्हापरिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असून, राजकीय समीकरणे आता अधिक रंजक झाली आहेत. महायुतीच्या उमेदवारांच्या विरोधात नेरूर पंचक्रोशीतील स्थानिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत ‘नेरूर पंचक्रोशी ग्राम विकास आघाडी’ या नवीन पॅनलची घोषणा केली आहे. गुरुवारी नेरूर येथील ग्रामदैवत श्री देव कलेश्वर मंदिरात श्रीफळ अर्पण करून या पॅनलच्या प्रचाराचा अधिकृत प्रारंभकरण्यात आला.
या निवडणुकीत वारंवार त्याच जुन्या चेहऱ्यांना संधी देण्यापेक्षा नव्या दमाच्या उमेदवारांना संधी मिळावी, या उद्देशाने या आघाडीची स्थापना करण्यात आली आहे. असे मत वैभव नाईक यांनी व्यक्त केले. या पॅनलमध्ये खालील उमेदवार रिंगणात आहेत: रुपेश पावसकरः अपक्ष जिल्हापरिषद उमेदवार.
अर्चना बंगेः पंचायत समिती उमेदवार (उबाठा गट पुरस्कृत).
दीप्ती नाईकः पंचायत समिती उमेदवार (उबाठा गट पुरस्कृत).
या नवीन पॅनलला माजी आमदार वैभव नाईक यांनी जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. यावेळी बोलताना त्यांनी महायुतीवर निशाणा साधला. नाईक म्हणाले, “नेरूर पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा कल पाहता आणि रुपेश पावसकर यांची जनशक्ती लक्षात घेता, आम्ही या पॅनलला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
नेरूरची एकजट हीच या पॅनलची ताकद आहे ”
नवे चेहरे, नवा विकास’ हाच अजेंडा स्थानिक नागरिकांशी असलेला दांडगा संपर्क आणि गेल्या काही वर्षांत केलेली सामाजिक कामे याच्या जोरावर हे पॅनल निश्चितपणे विजयी होईल, असा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला आहे. प्रस्थापितांविरुद्ध स्थानिक शक्ती अशी ही लढत आता तालुक्यात चर्चेचा विषय ठरत आहे. यावेळी नेरूर पंचक्रोशीतील ग्रामस्थ, कार्यकर्ते आणि ग्राम विकास आघाडीचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रचाराच्या पहिल्याच दिवशी मिळालेला प्रतिसाद पाहता, नेरूर जिल्हापरिषद मतदारसंघात महायुतीसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
