शासकीय मेडिकल कॉलेज अधिष्ठातांच्या आडमुठ्या कारभारामुळे आयुष रुग्णालय मुहूर्ताच्या प्रतीक्षेत..?

30 घाटांच्या मंजूर असलेल्या आयुष रुग्णालयास डीनकडून इमारतीचा ताबा देण्यास वर्षभरापासून केली जातेय दिरंगाई..!

अन्यथा.. अधिष्ठातांचा निषेध करण्यासाठी “मुहूर्त पंचांग” भेट देणार.. प्रसाद गावडेंचा इशारा

सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 30 खाटांचे आयुष रुग्णालय मंजूर असून रुग्णालयासाठी बांधण्यात आलेली इमारत सद्यस्थित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ताब्यात आहे.सदरील इमारतीचा अर्धा भाग आयुष रुग्णालय सुरू करण्यासाठी तात्काळ सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ताब्यात द्यावा अशा प्रकारचे निर्देश सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. सिंधुदुर्ग यांनी देऊन देखील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता श्री.दवंगे यांनी सदरच्या आदेशांना केराची टोपली दाखवत इमारत चक्क निर्लेखीत साहित्य ठेवण्यासाठी राखून ठेवली आहे. डीनच्या आडमुठ्या कारभारामुळे जिल्ह्यातील जनतेला फटका बसत असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक रुग्णांना आयुर्वेदिक चिकित्सेकरिता धारवाड येथे आयुर्वेद संस्थान रुग्णालयात जावे लागत आहे. हे आयुष रुग्णालय वेळीच जिल्ह्यात सुरु झाले असते तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला पंचकर्म व आयुर्वेद सेवा जिल्ह्यातच उपलब्ध झाल्या असत्या व नागरिकांचे हेलपाटे थांबले असते. आयुष रुग्णालय इमारतीसाठी केंद्र शासन आयुष मंत्रालयाने 6 कोटी खर्च करून देखील आयुष मंत्रालयाच्या मूळ उद्देशांना डीनच्या आडमुठेपणामुळे हरताळ फासला जात असून जिल्ह्याधिकाऱ्यांच्या आदेशांची पायमल्ली करणाऱ्या अधिष्ठातांवर कारवाईस का विलंब केला जातोय हा खरा प्रश्न आहे.मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलच्या कारभारावर वारंवार होणारे भ्रष्टाचारचे व रुग्णांच्या हलगर्जीपणाचे आरोप पाहता डीनला नक्की कोण पाठीशी घालतंय हा खरा प्रश्न असून आयुष रुग्णालय तात्काळ सुरु न झाल्यास प्रसंगी वेळ काढूपणा करणाऱ्या अधिष्ठातांचा निषेध दर्शवण्यासाठी मुहूर्त पंचांग भेट देणार अशा इशारा शिवसेना कामगार सेना अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते प्रसाद गावडे यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page