महाराष्ट्रावरील दुष्काळाचे सावट दूर होऊन शेतकरी बांधवांना सुख-समृद्धी लाभावी, अशी श्री माऊली चरणी प्रार्थना
सावंतवाडी प्रतिनिधी
तालुक्यातील लोटांगणांची म्हणून प्रसिद्ध असलेल्या सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव आज मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा होत आहे. या जत्रोत्सवानिमित्त पहाटेपासूनच देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली असून, संपूर्ण सोनुर्ली नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे.
या पवित्र जत्रोत्सवाचे औचित्य साधून भाजपचे युवा उद्योजक विशाल परब यांनी आज सकाळी आपल्या कार्यकर्त्यांसह श्री देवी माऊलीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी देवीच्या चरणी नतमस्तक होत राज्यातील जनतेच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.
महाराष्ट्रावर असलेले दुष्काळाचे सावट लवकरात लवकर दूर व्हावे, शेतकरी बांधवांना चांगले पीक आणि समाधानकारक पाऊस लाभावा, राज्यातील बळीराजा सुखी व समृद्ध व्हावा, तसेच सर्वसामान्य जनतेच्या जीवनात आनंद, आरोग्य आणि भरभराट नांदावी, अशी मनोकामना त्यांनी श्री माऊलीच्या चरणी व्यक्त केली.
यावेळी विशाल परब यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते व स्थानिक भाविक उपस्थित होते.
