सावंतवाडी भूमी अभिलेख कार्यालयातील घटना..
सावंतवाडी प्रतिनिधी
येथील भूमी अभिलेख कार्यालयातील भूमापकाने मालमत्तेच्या कामासाठी लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस आला असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
मालमत्तेच्या पोटहिस्सा मोजणीचे काम पूर्ण करून देण्यासाठी भूमापक ओमकार सुरेंद्र आपटे (वय ३३) याने तक्रारदाराकडे २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केल्यानंतर १३ एप्रिल २०२६ रोजी पडताळणी करून सापळा रचण्यात आला. या कारवाईत आपटे याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक विजय पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पोलीस निरीक्षक दीपक माळी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. शासकीय कामासाठी कुणीही लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी तातडीने एसीबीशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागामार्फत करण्यात आले आहे.
