सावंतवाडी प्रतिनिधी
सोशल मीडियावर सध्या प्रसारित होत असलेल्या ‘सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशन, सावंतवाडी’ आयोजित कथित “जिल्हास्तरीय कबड्डी पंच शिबिरा” बाबत खेळाडू, पंच आणि क्रीडाप्रेमींनी पूर्णपणे सावध राहावे, असा थेट इशारा सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी असोसिएशनने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.
धर्मादाय सहआयुक्त (कोल्हापूर) आणि सहाय्यक धर्मादाय आयुक्त (सिंधुदुर्ग) यांनी पारित केलेल्या आदेशानुसार सन २०१६ ते २०२७ या कालावधीसाठी संबंधित संस्थेचे Public Trust Registration (PTR) आणि मान्यता पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. स्पोर्ट्स कोडचे थेट उल्लंघन, संस्थापक अध्यक्ष हयात असताना त्यांना मयत दाखवणे, मोठे आर्थिक गैरव्यवहार आणि बेकायदेशीर तालुका असोसिएशन चालवणे यांसारख्या अत्यंत गंभीर कारणांमुळे ही कारवाई करण्यात आल्याचे असोसिएशनने स्पष्ट केले आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व खेळाडू, पंच, प्रशिक्षक व पालकांनी अशा कोणत्याही अनधिकृत उपक्रमांमध्ये सहभागी होऊ नये आणि कोणतेही
शुल्क भरू नये. तसेच इतर क्रीडा संस्थांनीदेखील या फेडरेशनच्या सहकार्याने कोणत्याही स्पर्धांचे आयोजन करू नये. कबड्डीशी संबंधित कोणतेही अधिकृत प्रशिक्षण व परीक्षांची माहिती केवळ नोंदणीकृत ‘सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी असोसिएशन’कडूनच घ्यावी, असे आवाहन अध्यक्ष श्री. प्रसाद अरविंदेकर यांनी केले आहे.
