धनादेश अनादर प्रकरणी संजय पवार व सायली पवार यांची निर्दोष मुक्तता

मालवण न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय; आरोपींच्या वतीने अॅड. महेश कुंटे व अॅड. अमित कुंटे यांचा युक्तिवाद

मालवण प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्हा वैश्यसमाज पतसंस्था, मालवण यांनी दाखल केलेल्या धनादेश अनादराच्या दोन फौजदारी खटल्यांत संजय शामराव पवार व त्यांच्या पत्नी सौ. सायली संजय पवार (रा. मुंबई) यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. मालवण येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री. फकीह यांनी हा निर्णय दिला.

सिंधुदुर्ग जिल्हा वैश्यसमाज पतसंस्थेने संजय पवार व सौ. सायली पवार यांना कर्ज दिले होते. या कर्जाच्या परतफेडीसाठी त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा मालवण येथील अनुक्रमे ४९,०५४ रुपये व ५५,५५६ रुपये रकमेचे धनादेश दिले होते. मात्र, या धनादेशांचा अनादर झाल्याने पतसंस्थेने दोघांविरुद्ध परक्राम्य लिखत अधिनियमाच्या कलम १३८ अन्वये मालवण न्यायालयात फौजदारी खटले दाखल केले होते.

या खटल्यांच्या सुनावणीदरम्यान आरोपींच्या वतीने युक्तिवाद करताना पतसंस्थेच्या कर्जविषयक नोंदींमधील तफावती व त्रुटी, कर्जदाराने भरलेल्या रकमांचा योग्य हिशोब न ठेवणे, परतफेडीच्या नोंदींचा अभाव, व्याजासंदर्भातील कायदेशीर तरतुदी व नियम सादर न करणे, तसेच कर्जखात्यातील प्रत्यक्ष देय रकमेचा निश्चित हिशोब न देणे, या बाबी न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या.

न्यायालयाने आरोपींच्या वतीने मांडलेल्या बाबी विचारात घेऊन दोन्ही प्रकरणांत संजय पवार व सौ. सायली पवार यांची निर्दोष मुक्तता केली.

या प्रकरणात आरोपींच्या वतीने अॅड. महेश कुंटे व अॅड. अमित कुंटे यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page