कुडाळ : प्रतिनिधी
सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी पिंगुळी येथील ग्राम महसूल अधिकारी तथा तलाठी जितेंद्र काळू खेताडे (वय २८) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सिंधुदुर्ग पथकाने शुक्रवारी (२३ ऑक्टोबर) कुडाळ-वेंगुर्ला मार्गावरील रेल्वे ब्रिजजवळ सापळा रचून पकडले. लाचेची रक्कम स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार वकिलाने आपल्या अशिलाच्या सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी तलाठी कार्यालयात प्रकरण दाखल केले होते. या कामाच्या मोबदल्यात तलाठी खेताडे यांनी ५ हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार २३ ऑक्टोबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर विभागाच्या पथकाने सापळा रचला. यावेळी कुडाळ-वेंगुर्ला मार्गावरील रेल्वे ब्रिजजवळ लाचेची रक्कम स्वीकारताना तलाठी खेताडे यांना पकडण्यात आले. या प्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनवणे व सुहास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग युनिटच्या पोलीस उपअधीक्षक संगीता पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या पथकात पोलीस निरीक्षक दीपक माळी, पोलीस हवालदार प्रीतम कदम, महेश जगताप, नागेश खोत, योगेश मुंढे, भूषण नाईक आणि स्वाती राऊळ यांचा सहभाग होता.
