सावंतवाडी प्रतिनिधी
कुडाळ तालुक्यातील माणगाव येथील रहिवासी राजाराम भिवा कांडरकर याने जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर महाराष्ट्र राज्य सुरक्षा दलात भरती होण्याचा मान मिळवला आहे. अनेक अडचणींवर मात करत त्याने मिळवलेल्या या यशाबद्दल शिवशक्ती अकॅडमीच्या वतीने मैदानावर त्याचा विशेष सत्कार करण्यात आला.
घरची परिस्थिती बेताची असतानाही त्यांनी स्वतः काम करून आपल्या पोलीस भरतीच्या स्वप्नासाठी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले. यापूर्वी त्यांनी होमगार्ड म्हणूनही सेवा बजावली होती. कामाची जबाबदारी सांभाळत नियमित सराव आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी भरतीचे ध्येय गाठले.
दरम्यान, जून महिन्यात त्यांच्या आईचे निधन झाले. या दुःखद प्रसंगामुळे त्यांच्यावर मोठे संकट कोसळले; मात्र अशा कठीण परिस्थितीतही त्यांनी हार न मानता आपले ध्येय पूर्ण केले. त्यांच्या या जिद्दीचे आणि संघर्षाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
या यशाबद्दल शिवशक्ती अकॅडमीच्या वतीने मैदानावर राजाराम कांडरकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विशाल मोहिते, अकॅडमीचे प्रशिक्षक नितीन सावंत तसेच अकॅडमीचे विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी अकॅडमीचे संचालक नितीन सावंत यांनी आगामी काळातही शिवशक्ती अकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना यशस्वी प्रशिक्षण देण्याचा विश्वास व्यक्त केला. आगामी काळात तलाठी आणि पोलीस भरतीच्या संधी लक्षात घेता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना दर्जेदार प्रशिक्षण देण्यासाठी अकॅडमी सज्ज असून, प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
