जिल्ह्यातील वाहनांना टोलमुक्ती जाहीर केल्याबद्दल व्यापारी बांधवांनी पालकमंत्री नितेश राणेंचे मानले आभार

जिल्ह्यातील सर्व बाजारपेठेत सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार – पालकमंत्री नितेश राणे

वैभववाडी (प्रतिनिधी)
सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यातील सर्व बाजारपेठामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लवकरच कार्यान्वित केले जातील. तसेच कचरामुक्त जिल्ह्यासाठी सर्व शहरातून कचराकुंड्या उभारणार असे आश्वासन जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा व्यापारी पदाधिकाऱ्यांना दिले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहनांना टोलमुक्ती जाहीर केल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघातर्फे पालकमंत्री नितेश राणे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच आभार मानण्यात आले. शनिवारी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ अध्यक्ष संजय सावंत यांच्यासह पदाधिकारी यांनी पालकमंत्री नाम. नितेश राणे यांची कणकवली येथे ओम गणेश या निवासस्थानी भेट घेतली. व्यापाऱ्यांच्या विविध प्रश्नाबाबत पदाधिकाऱ्यांनी नामदार नितेश राणे यांच्याशी प्रदिर्घ चर्चा केली.
ओसरगाव येथील टोलमधून सिंधुदुर्ग पासिंगच्या गाड्यांना वगळण्यात येणार असे पालकमंत्री नितेश राणे यांनी जाहीर केले. त्याचबरोबर महासंघाच्या कार्यालयासाठी भुखंड देण्याचेही त्यांनी आश्वासित केले. कचरामुक्त जिल्हा करण्यासाठी जिल्हा नियोजन मधून सर्व बाजारपेठांसाठी कचरा कुंड्या देण्यात येणार आहेत.
संपूर्ण जिल्ह्यातील बाजारपेठेंच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लवकरच बसविण्यात येणार असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले. परप्रांतिय व्यापारी रोखण्यासाठी फिरत्या व्यापार्यांना महासंघातर्फे ओळखपत्रे देण्यात यावीत अशी सुचना राणे यांनी पदाधिकारी यांना केली.
जिल्ह्यातील व्यापार उद्योग वाढण्याचा दृष्टीने सकारात्मक चर्चा झाली. दर तिन महिन्यांनी महासंघाच्या कार्यकारिणीसोबत बैठकीचे आश्वासन पालकमंत्री यांनी दिले.
यावेळी महासंघाचे अध्यक्ष संजयजी सावंत, कार्यवाह राजू जठार, माजी अध्यक्ष द्वारकानाथ घूर्ये, सहकार्यवाह राजन नाईक, उपाध्यक्ष भोगले साहेब, उपाध्यक्ष अवधुत शिरसाट, उपाध्यक्ष पुंडलीक दळवी, कुडाळ तालुका अध्यक्ष पी‌ .डी.शिरसाट, सावंतवाडी तालुका अध्यक्ष जगदिश मांजरेकर, विजय केनवडेकर, संतोष नानचे, प्रकाश वाळके, हर्षल बांदेकर, राजेंद्र पिसे आदि महासंघाचे पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page