कुडाळ तालुक्यात ७ मार्चपासून मंडळ निहाय शिबिरांचे आयोजन..!

नागरिकांना गावातच मिळणार महसूल सेवांचा लाभ-तहसीलदार सचिन पाटील

कुडाळ प्रतिनिधी
तहसील कार्यालय कुडाळमार्फत ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियान (टप्पा-१) अंतर्गत तालुक्यातील प्रत्येक महसूल मंडळ स्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. सदर शिबिरे ७ मार्च ते २० मे २०२६ या कालावधीत १० मंडळात आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती कुडाळचे तहसीलदार सचिन पाटील यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, कुडाळ उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुशे यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी, महिला तसेच ग्रामस्थांना महसूल विभागाच्या विविध १५ सेवांचा लाभ एकाच दिवशी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत तालुक्यातील सर्व महसूल मंडळ तसेच नगरपालिका व नगरपंचायत स्तरावर समाधान शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. या शिबिरांमध्ये प्रलंबित फेरफार प्रकरणे, ७/१२ मधील दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरीयुक्त ७/१२ व ८-अ उतारे, रहिवासी व जात प्रमाणपत्र, नॉन-क्रिमिलिअर प्रमाणपत्र, अकृषिक (NA) परवानगी, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे लाभ मंजूर करणे, तुकडेबंदी कायद्यांतर्गत प्रकरणांचा निपटारा, ई मोजणी अर्ज, AgriStack शेतकरी नोंदणी, पीएम किसान नोंदणी, वर्ग २ ते वर्ग १ रूपांतरण, भूसंपादन तसेच अकृषिक परवानगीसंदर्भातील विविध सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

मंडळनिहाय शिबिरांचे वेळापत्रक पढीलप्रमाणे :
वालावल मंडळ ०७ मार्च २०२६

कसाल मंडळ – १४ मार्च २०२६

गोठोस मंडळ – २५ मार्च २०२६

ओरोस बुद्रुक मंडळ – १० एप्रिल २०२६

कडावल मंडळ – १७ एप्रिल २०२६

पिंगुळी मंडळ – २४ एप्रिल २०२६

झाराप मंडळ – ३० एप्रिल २०२६

कुडाळ मंडळ – ०८ मे २०२६

माणगाव मंडळ – १५ मे २०२६

मडगाव (माड्याचीवाडी) मंडळ २० मे २०२६.

तरी संबंधित मंडळ स्तरावर आयोजित करण्यात येणाऱ्या शिबिरांमध्ये नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून महसूल विभागाच्या विविध सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार सचिन पाटील यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page