पत्रकारांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य भोवले; अधीक्षक अभियंता पद्माकर पाटील यांना जिल्हाधिकाऱ्यांची कारणे दाखवा नोटीस!

24 तासात खुलासा देण्याचे आदेश! अधीक्षक अभियंत्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका !

सिंधुदुर्ग प्रतिनिधी
राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या तिलारी दौऱ्याच्या पूर्वतयारीदरम्यान पत्रकारांबाबत आक्षेपार्ह आणि असभ्य भाषा वापरणे जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता पद्माकर पाटील यांना चांगलेच महागात पडले आहे. ‘फोटो काढणाऱ्याला उचलून फेकून द्या’, अशा आशयाचे वक्तव्य केल्याच्या वृत्ताची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी पाटील यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. नोटीस मिळाल्यापासून २४ तासांच्या आत सविस्तर लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अन्यथा अथवा सादर केलेला खुलासा असमाधानकारक ठरल्यास पुढील शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल हे २१ ते २४ नोव्हेंबरदरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर दोडामार्ग तालुक्यातील तिलारी परिसरात स्वच्छता आणि अन्य पूर्वतयारीची कामे युद्धपातळीवर सुरू होती. याचदरम्यान घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसमोर अधीक्षक अभियंता पद्माकर पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांना उद्देशून ‘फोटो काढणाऱ्याला उचलून फेकून द्या’, अशा आशयाचे वक्तव्य केल्याचे वृत्त शक्तिपथ Live यासह अन्य प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केले होते.

या वृत्ताची दखल घेत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी २३ नोव्हेंबर रोजी संबंधित अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावली. शासकीय सेवेत वरिष्ठ आणि जबाबदार पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांकडून सार्वजनिक ठिकाणी कामकाज करताना तसेच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना शासकीय शिष्टाचार, संयम आणि सौजन्याचे पालन होणे अपेक्षित असल्याचे नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.

पत्रकारांसमोर वापरण्यात आलेली आक्षेपार्ह भाषा आणि संबंधित अधिकाऱ्याचे वर्तन हे गंभीर स्वरूपाचे असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. अशा प्रकारामुळे जिल्हा प्रशासनाची प्रतिमा मलिन होत असल्याचेही नोटिशीत नमूद करण्यात आले आहे. या नोटिशीची प्रत सिंधुदुर्गचे पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी, कोकण विभागाचे विभागीय आयुक्त तसेच जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता यांनाही पाठविण्यात आली आहे.

दरम्यान, या प्रकरणामुळे प्रशासकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून अधीक्षक अभियंता पद्माकर पाटील हे आपल्या खुलाशात काय भूमिका मांडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच त्यांच्या खुलाशानंतर जिल्हाधिकारी कोणती पुढील भूमिका घेतात, याबाबत जिल्ह्यातील पत्रकारिता क्षेत्रासह प्रशासकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page