कुडाळ वनपरिक्षेत्रातील चाफेली जंगलात ‘सप्तरंगी’ औषधी वनस्पतींची अवैध तोड प्रकरणी एकाला ताब्यात

कुडाळ वनविभागाची धडक कारवाई
कुडाळ (प्रतिनिधी)
सावंतवाडी वनविभाग अंतर्गत कुडाळ वनपरिक्षेत्रातील चाफेली वन परिमंडळामध्ये नेरूर कर्याद नारूर पश्चिम नियतक्षेत्रातील शासकीय राखीव जंगलात ‘सप्तरंगी’ या औषधी वनस्पतीची अवैध तोड करून मुळे काढून वाहतूक करणाऱ्या इसमास वनविभागाने अटक केली आहे. या कारवाईत २६ पोत्यांमध्ये भरलेला ९६१ किलो वजनाचा सुमारे ५६ हजार ६९९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर प्रकरणात आणखी काही आरोपींचा सहभाग असल्याचा संशय असून त्यांना लवकरच ताब्यात घेण्यात येईल, अशी माहीती कुडाळचे वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप कुंभार यांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, मौजे नेरूर ता.क. पश्चिम गावामध्ये वनविभागाचे सुमारे ९४७.२७ हेक्टर क्षेत्रफळाचे राखीव वन आहे. दि. ३ मार्च २०२६ रोजी वनपाल चाफेली, वनरक्षक नेरूर ता.क. पश्चिम, वनरक्षक चाफेली व वनरक्षक पुळास हे कर्मचारी रात्री गस्त घालत असताना दि. ४ मार्च रोजी पहाटे सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास कक्ष क्रमांक ९०ए च्या पायथ्याशी असलेल्या कोरड्या नदीपात्रातून एक इसम डांबरी रस्त्याकडे शिरओझ्याने ‘सप्तरंगी’ वनस्पतीची वाहतूक करताना आढळून आला. वनविभागाच्या पथकाने सदर इसमास अटकाव करून विचारणा केली असता त्याचे नाव विठ्ठल लक्ष्मण लगड असे असल्याचे समोर आले. वनपाल चाफेली यांनी दोन पंचांसमक्ष पंचनामा करून आरोपीच्या ताब्यातून ‘सप्तरंगी’ वनस्पतीची मुळे व फांद्या भरलेली २६ पोती जप्त केली. याबाबत वनगुन्हा नोंद करण्यात आला.

दि. ४ मार्च रोजी सदर आरोपीला कुडाळ येथील रेंज कार्यालयात चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान विठ्ठल लगड यांनी फरार आरोपींच्या संगनमताने मौजे नेरूर ता.क. पश्चिम येथील शासकीय राखीव वन कक्ष क्रमांक ९०ए मध्ये बेकायदेशीर प्रवेश करून ‘सप्तरंगी’
झाडांची तोड करून त्यांची मुळे खोदून विक्रीच्या उद्देशाने वाहतूक केल्याची कबुली दिली. त्यानंतर पंचासमक्ष अटक पंचनामा करून आरोपीस अटक करण्यात आली. वैद्यकीय तपासणीनंतर न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दि. ५ मार्च २०२६ पर्यंत फॉरेस्ट कस्टडी मंजूर केली आहे.

या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाचे एकूण वजन ९६१ किलो असून त्याची अंदाजे किंमत ५६,६९९ रुपये इतकी आहे. या गुन्ह्याचा तपास उपवनसंरक्षक मिलिंद दत्त शर्मा व सहायक वनसंरक्षक एस. के. लाड (सावंतवाडी) यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळचे वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप कुंभार करीत आहेत.

कारवाईदरम्यान वनपाल (चाफेली) संतोष गोरे, वनरक्षक निखिल खोत (नेरूर ता.क. पश्चिम), शिवाजी पाटील (पुळास), किरण गोसावी (चाफेली) तसेच वनपाल मठ सावळा कांबळे यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page