सावंतवाडी प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या ‘वेताळ प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग – तुळस’ या संस्थेच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून ‘नारी अभ्युदय महोत्सव’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. “सक्षम स्त्री, सक्षम समाज” हा मुख्य विचार केंद्रस्थानी ठेवून आयोजित करण्यात आलेला हा सोहळा येत्या शुक्रवारी, १३ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता सावंतवाडी येथील जगन्नाथराव भोसले उद्यान येथे अतिशय उत्साहात संपन्न होणार आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून जिल्ह्यातील कर्तृत्ववान स्त्रियांच्या कार्याचा गौरव करण्यात येणार असून, स्त्रीशक्तीचा जागर करणे हा यामागचा प्रमुख उद्देश आहे.
या भव्य कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या मा. सौ. वेदिका विशाल परब उपस्थित राहणार असून, त्यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील महिलांचा गौरव केला जाणार आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्ह्यातील पंचायत समिती व जिल्हा परिषदेवर नवनिर्वाचित झालेल्या महिला सदस्यांचा विशेष सन्मान सोहळा पार पडणार आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात सामाजिक, शैक्षणिक आणि इतर क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करून समाजासमोर आदर्श निर्माण करणाऱ्या महिलांचाही यावेळी विशेष सन्मान करण्यात येईल. या सन्मान सोहळ्यामुळे ग्रामीण भागातील महिलांच्या कर्तृत्वाला नवी उभारी मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
केवळ सन्मान सोहळाच नव्हे, तर महिलांच्या मनोरंजनासाठी आणि संस्कृती रक्षणासाठी देखील या महोत्सवात विशेष उपक्रम राबवले जाणार आहेत. यामध्ये पारंपारिक ‘हळदी-कुंकू’ समारंभाचे आयोजन करण्यात आले असून, महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ‘सौभाग्य संध्या’ हा विशेष मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर केला जाईल. “इमान इथल्या मातीशी, माणुसकीच्या नात्याशी” हे ब्रीदवाक्य जपत वेताळ प्रतिष्ठानने नेहमीच लोकहितार्थ कार्य केले आहे. समाजातील महिलांच्या कर्तृत्वाला दाद देणे, त्यांना प्रेरणा देणे आणि स्त्रीशक्तीचा यथोचित सन्मान करणे ही काळाची गरज ओळखून या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. तरी या महोत्सवास सावंतवाडी आणि परिसरातील महिलांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन वेताळ प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग – तुळस यांच्या वतीने करण्यात आले आहे.
सावंतवाडीत १३ मार्च रोजी ‘नारी अभ्युदय महोत्सव’ चे आयोजन..!
