प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध; नावांबाबत हरकती व दावे असल्यास सादर करावेत
*सिंधुदुर्ग, दि. ३१* : विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत (SIR 2026) प्रारुप मतदार यादी आज प्रसिद्ध करण्यात आली आहे. मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि सर्वसमावेशक करण्यासाठी नागरिकांनी प्रारुप मतदार यादी तपासून आवश्यक असल्यास विहित मुदतीत दावे व हरकती सादर कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले आहे. प्रारुप मतदार यादीतील नाव निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर, जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर तसेच आपल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदारांना पडताळता येईल. जिल्हाधिकारी कार्यालयात त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. यावेळी उपजिल्हाधिकारी निवडणूक बालाजी शेवाळे उपस्थित होते.
जिल्ह्यातील प्रारुप मतदार यादीमध्ये एकूण ६ लाख ५ हजार ४९९ मतदारांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये ३ लाख ५ हजार ७५६ पुरुष मतदार आणि २ लाख ९९ हजार ७४३ महिला मतदारांचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण ९२१ मतदान केंद्रे आहेत.
जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय प्रारुप मतदारांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. २६८-कणकवली विधानसभा मतदारसंघात ३३२ मतदान केंद्रे असून २ लाख ९ हजार २४२ मतदार, २६९-कुडाळ विधानसभा मतदारसंघात २७९ मतदान केंद्रे असून १ लाख ९१ हजार ८४६ मतदार, तर २७०-सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात ३१० मतदान केंद्रे असून २ लाख ४ हजार ४११ मतदार आहेत.
विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात आली. या प्रक्रियेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पूर्वीच्या ६ लाख ८८ हजार १४ मतदारांपैकी ८२ हजार ५१७ नोंदी वगळण्यात आल्या असून, प्रारुप मतदार यादीतील मतदारांची संख्या आता ६ लाख ५ हजार ४९९ इतकी झाली आहे. वगळण्यात आलेल्या नोंदींमध्ये ३६ हजार ६०९ मृत मतदार, ३३ हजार ७६६ कायमस्वरूपी स्थलांतरित मतदार, ७ हजार ६६७ दुबार नोंदी तसेच ४ हजार ४८३ इतर कारणांमुळे अपात्र अथवा शोधूनही न सापडलेल्या मतदारांच्या नोंदींचा समावेश आहे. त्यामुळे मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि वास्तवस्थितीशी सुसंगत करण्याच्या उद्देशाने ही प्रक्रिया राबविण्यात आली आहे.
*३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबरपर्यंत दावे व हरकती*
बऱ्याच नागरिकांना मतदार यादीतील आपल्या नावाबाबत किंवा नोंदींबाबत शंका असू शकतात. मतदारांनी प्रारुप मतदार यादीमध्ये आपले नाव, पत्ता तसेच इतर तपशील तपासून घ्यावेत. नावाचा समावेश करणे, चुकीची नोंद दुरुस्त करणे अथवा मतदार यादीतील इतर नोंदींबाबत हरकत असल्यास ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत दावे व हरकती सादर करता येतील.
प्राप्त दावे व हरकतींवर नियमानुसार सुनावणी घेऊन त्यांचा निपटारा करण्याची प्रक्रिया २९ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर सर्व आवश्यक कार्यवाही पूर्ण करून अंतिम मतदार यादी ०४ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
मतदारांनी आपल्या नावाची पडताळणी करून आवश्यक असल्यास विहित नमुन्यात अर्ज करावेत. नवीन नाव नोंदणीसाठी फॉर्म ६, नाव वगळण्यासाठी अथवा हरकतींसाठी संबंधित विहित नमुने वापरता येतील. नागरिकांना मतदार नोंदणी व दुरुस्तीसाठी Voter Helpline App तसेच ECINet या माध्यमांचाही उपयोग करता येणार आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, लोकशाही प्रक्रियेमध्ये अचूक आणि अद्ययावत मतदार यादीला अत्यंत महत्त्व आहे. त्यामुळे प्रत्येक पात्र नागरिकाने प्रारुप मतदार यादी तपासून आपले नाव व तपशील योग्य असल्याची खात्री करावी. मतदार यादीमध्ये आवश्यक बदल असल्यास मुदतीत दावे व हरकती सादर करून विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाला सहकार्य करावे, असेही त्यांनी आवाहन केले आहे.
0000
