विश्वकर्मा सोशल वेलफेअरचा समाजभूषण पुरस्कार सोहळा पुण्यात उत्साहात संपन्न

“सिंधुदुर्गच्या आनंद मेस्त्रींचा पुण्यात समाजभूषण पुरस्काराने गौरव”

पुणे प्रतिनिधी : विश्वकर्मा सोशल वेलफेअर फाउंडेशन ट्रस्ट, पुणे यांच्या वतीने आयोजित विद्यार्थी गुणगौरव व समाजभूषण पुरस्कार सोहळा रविवार, दि. ६ सप्टेंबर २०२६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, पुणे येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदानाबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र आनंद मेस्त्री यांना ‘समाजभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
विश्वकर्मा सोशल वेलफेअर फाउंडेशन ट्रस्ट ही सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेली अग्रगण्य संस्था असून, संस्थेच्या वतीने दरवर्षी विद्यार्थी गुणगौरव तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात येतो.
यंदाच्या सोहळ्यात आनंद मेस्त्री (सिंधुदुर्ग) – समाजभूषण, अभिजित भालेराव (सिन्नर) – क्रीडाभूषण, सुनीलजी पावले (अहिल्यानगर) – समाजभूषण यांच्यासह सामाजिक, शैक्षणिक व पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे दत्तात्रय जाधव आणि शिल्पकार अश्विनी कुदळे यांना विशेष उल्लेखनीय कार्य सन्मानाने गौरविण्यात आले.
तसेच पंडित नंदकिशोर कपोते यांचे शिष्य आंतरराष्ट्रीय सतारवादक मिलिंदकुमार आणि त्यांच्या शिष्यांनी सादर केलेल्या कथ्थक नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. ‘काश्मीर ते कन्याकुमारी’ या संकल्पनेअंतर्गत झालेल्या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय सतारवादक पंडित रविजी चारी यांच्या सतारवादनाने तसेच कथ्थक नृत्याच्या सादरीकरणाने उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले.
यावेळी समाजभूषण पुरस्कार स्वीकारल्यानंतर आनंद मेस्त्री यांनी देशाप्रती आत्मीयता बाळगत प्रत्येकाने आपले कार्य प्रामाणिकपणे केले पाहिजे, असा संदेश दिला.
संस्थेचे विश्वस्त व संस्थापक सदस्य विवेकानंद निर्मला पांडुरंग सुतार यांनी प्रास्ताविक केले. संस्थेच्या कार्याला सहकार्य करणारे हितचिंतक व देणगीदार यांचे ऋण व्यक्त करत त्यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. आसावरी बर्वे यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विश्वकर्मा सोशल वेलफेअर फाउंडेशन ट्रस्टच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page