संकटग्रस्त महिला व बालकांना सुरक्षिततेचा आधार; समाजाने सन्मानाने स्वीकारावे; जिल्हाधिकारी (सा.प्र) प्रतिभा वराळे

सिंधुदुर्ग प्रतिनिधी
अनाथ, निराधार आणि संकटग्रस्त बालकांना सुरक्षित वातावरण, शिक्षण व संगोपन उपलब्ध करून देणे, तसेच अन्यायग्रस्त व संकटात सापडलेल्या महिलांना आधार, समुपदेशन आणि पुनर्वसनाची संधी देणे, हे समाजाचे महत्त्वाचे दायित्व आहे. अशा महिला व बालकांकडे दयेच्या भावनेने नव्हे, तर सन्मानाने पाहून त्यांना स्वावलंबी होण्यासाठी समाजाने सहकार्य करावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) प्रतिभा वराळे यांनी केले.
जिल्हा महिला व बाल विकास विभागाच्या योजनांची माहिती देताना शासकीय मुलांचे निरीक्षण गृह व बालगृह, ओरोस आणि शासकीय अंकुर महिला वसतिगृह, सावंतवाडी यांच्या कार्याची माहिती दिली.
शासकीय मुलांचे निरीक्षण गृह व बालगृह, ओरोस
महिला व बाल विकास विभागामार्फत 1984 पासून कार्यरत असलेली शासकीय मुलांचे निरीक्षण गृह व बालगृह, ओरोस ही संस्था 6 ते 18 वर्षे वयोगटातील अनाथ, निराधार, निराश्रित, काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या तसेच विधिसंघर्षग्रस्त बालकांसाठी कार्य करते. या बालकांना सुरक्षित वातावरण, शिक्षण, आरोग्य सुविधा, कौशल्य विकास आणि योग्य संस्कार उपलब्ध करून देणे, तसेच त्यांचे कुटुंब किंवा समाजामध्ये योग्य पुनर्वसन घडवून आणणे, हा संस्थेचा प्रमुख उद्देश आहे.
शासकीय अंकुर महिला वसतिगृह, सावंतवाडी
शासकीय अंकुर महिला वसतिगृह, सावंतवाडी ही संस्था महिला व बाल विकास विभागामार्फत 1958 पासून कार्यरत आहे. 18 ते 60 वर्षे वयोगटातील अनाथ, निराधार, निराश्रित, अन्यायपीडित आणि संकटग्रस्त महिलांना सुरक्षित निवारा, आवश्यक मार्गदर्शन, समुपदेशन आणि पुनर्वसनाच्या माध्यमातून पुन्हा आत्मविश्वासाने उभे राहण्याची संधी या संस्थेमार्फत उपलब्ध करून दिली जाते.
समाजात कोणतीही महिला संकटाच्या वेळी एकटी पडू नये आणि कोणत्याही बालकाला आधारासाठी भटकावे लागू नये, यासाठी सर्वांनी संवेदनशीलतेने पुढाकार घेणे आवश्यक आहे. प्रत्येक महिला व बालकाला सुरक्षित, सन्मानपूर्ण आणि स्वावलंबी जीवन जगण्याची संधी मिळावी, यासाठी समाजाने सहकार्य करावे. संकटात सापडलेल्या, अन्यायपीडित, निराधार व निराश्रित महिलांनी मदतीसाठी महिला हेल्पलाइन क्रमांक 181 वर संपर्क साधावा, असे आवाहनही श्रीमती वराळे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page