वाढदिवसाला समाजसेवेची जोड! विशाल परब यांच्या संकल्पनेतून तळवडे येथे महाआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ‘

‘बुके आणि पोस्टरपेक्षा आरोग्यसेवा अन् जलसंधारणाला प्राधान्य’; भाजपा सिंधुदुर्ग व मराठा ऐक्यवर्धक मंडळाचा पुढाकार

सावंतवाडी प्रतिनिधी
वाढदिवस म्हटला की शुभेच्छा, सत्कार, पुष्पगुच्छ आणि जाहिरातींची रेलचेल पाहायला मिळते. मात्र, या परंपरेला वेगळी दिशा देत समाजहिताला प्राधान्य देण्याचा संदेश भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांतून दिला जात आहे. ‘बुकेऐवजी बंधारा आणि पोस्टरऐवजी आरोग्यसेवा’ ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवत आरोग्यसेवा आणि जलसंधारणाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांसाठी विधायक काम उभे करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सप्टेंबर महिन्यात राबविण्यात आलेल्या सेवा अभियानाच्या धर्तीवर या सामाजिक उपक्रमांना पुढे नेण्यात येत आहे. वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून त्याऐवजी जनतेच्या उपयोगी पडणारे उपक्रम राबविण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे.

तळवडे येथे महाआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

ग्रामीण तसेच दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्य तपासणी आणि वैद्यकीय मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने विविध जिल्हा परिषद मतदारसंघांत महाआरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. याच उपक्रमांतर्गत तळवडे येथे आयोजित महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या शिबिराचे उद्घाटन सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. मराठा समाज ऐक्यवर्धक मंडळ, तळवडे यांच्या वतीने आयोजित या शिबिराचा तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघातील नागरिकांनी लाभ घेतला. ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्यविषयक सुविधा आणि मार्गदर्शन मिळावे, या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.

जलसंधारणातून शेतकऱ्यांना बळ देण्याचा प्रयत्न

आरोग्यसेवेबरोबरच लोकसहभागातून कच्चे बंधारे उभारण्याच्या संकल्पालाही या उपक्रमात महत्त्व देण्यात आले आहे. पावसाचे पाणी अडवून त्याचा उपयोग शेती आणि स्थानिक जलस्रोतांसाठी व्हावा, या उद्देशाने जलसंधारणाच्या कामांना चालना देण्याचा प्रयत्न आहे. शेतकरी, कष्टकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा संदेश यातून दिला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page