सावंतवाडी प्रतिनिधी
सावंतवाडी तालुक्यातील चराठा टेंबवाडी येथे एका २६ वर्षीय तरुणानं राहत्या घरातील खोलीत गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. परेश उमेश तांबोस्कर असे मृत तरुणाचे नाव असून, गुरुवारी (ता. २२) सकाळी ही दुर्घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण परिसरात एकच शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास घरातील काही आवाज ऐकून चुलत भाऊ बाहेर आला असता, परेश याने खोलीतील लाकडी वाशाला कुत्रा बांधण्याच्या साखळीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे त्याच्या निदर्शनास आले. हा धक्कादायक प्रकार पाहताच कुटुंबीयांनी त्याला तात्काळ खाली उतरवून सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्या शरीरात कोणतीही हालचाल होत नसल्याने गावातल्या खासगी डॉक्टरांना बोलावण्यात आले, जिथे तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
तरुणाने नेमक्या कोणत्या कारणातून हे टोकाचं पाऊल उचललं, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. प्राथमिक अंदाजानुसार ही आत्महत्येची घटना असावी, असे पोलिसांकडून सांगितले जात असून याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. या अचानक घडलेल्या घटनेमुळे चराठा आणि परिसरामध्ये गावकऱ्यांकडून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
