गटनेते पदी योगेश धुरी यांची निवड
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ पंचायत समितीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या सदस्यांनी ‘शिवशक्ती विकास गट’ या नावाने गट स्थापन केला आहे. गटनेते पदी युवासेना कुडाळ तालुकाप्रमुख तथा माणगाव पंचायत समिती सदस्य योगेश धुरी यांची पक्षाकडून निवड करण्यात आली असून याबाबतची माहीती श्री. धुरी यांनी दिली.
ठाकरे शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले योगेश धुरी, अर्चना बंगे, ममता राऊळ, बाळा कांदळकर आणि दिप्ती नाईक यांनी एकत्र येत हा गट स्थापन केला. गट स्थापनाबाबतचा ठराव व इतिवृत्त गुरुवारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांना सादर करण्यात आला. गटनेते पदी आपल्या निवडीबाबतची माहिती योगेश धुरी यांनी दिली. यावेळी ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, अमित राणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
