रानभाजी पाककला स्पर्धेतून निसर्गाच्या सकस अन्नाची मेजवानी

विशाल परब पुरस्कृत ‘उत्सव रानभाज्यांचा’; ६ सप्टेंबरला , वेंगुर्ल्यात रानभाजी पाककला स्पर्धा व प्रदर्शन

‘माझा वेंगुर्ला’, इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्ला आणि हिरकणी महिला शहरस्तर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने विशाल परब पुरस्कृत ‘उत्सव रानभाज्यांचा’ २०२६ अंतर्गत ‘रानभाजी पाककला स्पर्धा व प्रदर्शन’ आयोजित करण्यात आले आहे. निसर्ग आणि माणूस यांच्यातील पुरातन नाते अधिक दृढ करण्यासोबतच पारंपरिक रानभाज्यांची चव, त्यांचे महत्त्व आणि आरोग्यदायी गुणधर्म लोकांपर्यंत पोहोचविणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

ही अनोखी पाककला स्पर्धा रविवार, ६ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ३ वाजल्यापासून सिद्धिविनायक मंगल कार्यालय, भटवाडी, वेंगुर्ला येथे होणार आहे. स्पर्धकांनी निसर्गात सहज उपलब्ध होणाऱ्या विविध रानभाज्यांचा वापर करून स्वादिष्ट तसेच आरोग्यास हितकारक पदार्थ तयार करावयाचे आहेत. स्पर्धेतील पहिल्या पाच विजेत्यांना आकर्षक पारितोषिके देण्यात येणार असून, उर्वरित सहभागी स्पर्धकांना भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच भव्य लकी ड्रॉच्या माध्यमातून आकर्षक भेटवस्तू जिंकण्याची संधी सहभागी स्पर्धकांना मिळणार आहे.

स्पर्धेतील पाककृतीमध्ये फक्त रानभाज्यांचाच वापर करणे अनिवार्य आहे. यामध्ये फोडशी, तांदूळजा, घोळ, भारंगी, कुरडू, फागला, पेवा, टाकळा, कुडा, केना, पुनर्नवा, सोनारवेल, आडाळा, भुईआवळा, आघाडा, घोटवेल आदी रानभाज्यांचा उपयोग करता येणार आहे. रानभाज्यांच्या पारंपरिक पाककृतींना आधुनिक सादरीकरणाची जोड देत स्थानिक खाद्यसंस्कृतीचे जतन व संवर्धन करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येणार आहे.

स्पर्धेच्या नियमांनुसार तयार करण्यात येणारी पाककृती आरोग्यास हानिकारक ठरणार नाही, याची संपूर्ण जबाबदारी संबंधित स्पर्धकाची राहणार आहे. प्रवेशिका पूर्णपणे भरल्याशिवाय प्रवेश ग्राह्य धरला जाणार नाही. पूर्ण भरलेली प्रवेशिका स्पर्धेच्या वेळी आयोजकांकडे जमा करणे आवश्यक असून, तयार केलेल्या पाककृतीची संपूर्ण कृती प्रवेशिकेत सुवाच्च अक्षरात लिहिणे बंधनकारक आहे.

स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी अधिक माहितीसाठी ज्योती देसाई (९४२०२५८७७७), राजन (९४२३३०१३१०), यासिर (७०८३२२२४२२) आणि खेमराज (८४२१६९९७९७) यांच्याशी संपर्क साधावा. प्रवेशिका राजश्री कोल्ड्रींक्स, वेंगुर्ला येथे उपलब्ध आहेत.

रानभाज्यांची चव, पारंपरिक खाद्यसंस्कृती आणि आरोग्यदायी आहाराचा अनोखा संगम असलेल्या या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page